१४ डिसेंबर रोजी मोर्चा; जनजागृती युद्ध पातळीवर सुरु
विश्वास निकम
गोवे-कोलाड : कुणबी दाखला प्रश्नांवर रोहा तालुका कुणबी समाज येत्या १४ डिसेंबर रोजी रोहा तालुक्यात एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडणार असून यासाठी तालुक्यातील प्रमुख नेतेगण तसेच युवक मंडळाचे पदाधिकारी यासाठी तालुक्यातील गावोगावी फिरून दाखला प्रश्नावर जनजागृती करत आंदोलनाचे परिपत्रक वाटप करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.
जातीच्या दाखल्यासाठी व जात पडताळणीसाठी १९६७ पूर्वीच्या पुराव्याची जाचक अट रद्द झालीच पाहिजे ह्या प्रमुख मागणीसाठी रोहा तालुका कुणबी युवक मंडळ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन गुरुवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ठिक १० वाजता समाजातील प्रत्येक व्यक्तीला जातीचा दाखला मिळावा व त्याची जातपडताळणी व्हावी यासाठी संघटीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी गरज आहे ती आपल्या पाठबळाची. जोपर्यंत आपल्याला जातीच्या दाखल्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार येथील कुणबी समाज बांधवांनी केला आहे.
कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक सुरेश मगर, रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, उपाध्यक्ष शंकर भगत, युवक अध्यक्ष अनंत थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. ५ डिसेंबर रोजी तालुक्यातील खांब विभागातून मौजे गोवे येथून श्रीफळ वाढवून या कुणबी दाखला प्रश्नांवर झंझावत सुरु करत त्याची जनजागृती करत आंदोलनात बहुसंख्येने कुणबी बांधव तसेच युवक, युवती, महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असून सदरच्या या उपक्रमाला खांब विभागातून कुणबी युवक तसेच ग्रुपचे पदाधिकारी, महिला वर्गांकडून उत्सफूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात विविध समाज आपापल्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उचलत आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाज सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी करत आहे. या मागणीला कोकणातील मूलतः कुणबी असलेल्या समाजाकडून विरोध होत असताना रायगडमधील विशेषतः उत्तर रायगड रोहा तालुक्यासह सुधागड, खालापूर, कर्जत, पेण, पनवेल, अलिबाग, मुरूड, उरण येथील जन्माने आणि कर्माने कुणबी असलेला समाज आता अधिक आक्रमक होत आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला कडाडून विरोध दर्शवत जरांगे पाटलांची मागणी कुणबी समाज तसेच ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. तसेच येथील जन्माने आणि कर्माने असलेला कुणबी समाज हा कायमच जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने शैक्षणिक, नोकर भरती, व्यवसायात अर्थिकदृष्टया मागास राहीला आहे. ही भूमिका घेत यासाठी गावोगावी फिरून कुणबी बांधव यांच्यात जनजागृती करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विखुरलेला कुणबी समाज पुन्हा संघटीत करण्यात अधिक यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी खांब विभागांतील गोवे, पुई, पुगाव, डोळवहाल,मुठवली, शिरवली, वैजेनाथ, खांब,नडवली, तळवली, चिल्हे,धानकान्हे, देवकान्हे,बाहे,या गावांतून सुरूवात करण्यात आली असून येथील कुणबी समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले असून या दोन तीन दिवसात संपुर्ण तालुक्यातील गावोगावी कुणबी बांधव यांना सदरच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असून कुणबी दाखल्यांसाठी भुतो न भविष्य आंदोलन छेडणार असल्याचे कुणबी समाज नेते सुरेश मगर यांनी सांगितले. तर गावोगावी करत असलेल्या कुणबी दाखल्यांसाठीच्या या जनजागृतीत सर्व युवक मंडळ तसेच कुणबी बांधव यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
