शेतकऱ्याने दिला आमरण उपोषणचा इशारा
वैभव कळस
म्हसळा : अनेक वर्षापासून माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते. ते रस्त्याचे काम पूर्ण झाले परंतु, ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्गामध्ये गेली ते आजही भरपाईची वाट पाहत आहेत. असाच एक प्रकार म्हसळा येथे ज्येष्ठ नागरिक शरीफ हळदे यांचे सोबत घडला आहे.
गरीब शेतकऱ्याची जागा मौजे सकलप स. नं. १९/१ ही संपादित करण्यात आली होती. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते दिघे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. आजही ते मोबदल्याची वाट पाहत आहेत. वेळोवेळी अर्जाला केराची टोपली दाखवली गेली. अखेर त्यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे. दि. ५ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी अर्ज देऊन १५ दिवसात जर मोबदला मिळाला नाही तर मी उपविभागीय कार्यालय श्रीवर्धन यांच्यासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. या अर्जाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड, तहसीलदार म्हसळा यांच्या माहितीसाठी व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.
