देवेंद्र दरेकर
पोलादपूर : तालुक्यात एकाच दिवशी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी नागरी वस्तीलगत असलेल्या मोठ्या झाडांना भीषण आग लागल्याची घटना घडली असून स्थानिक ग्रामस्थ व नरवीर रेस्क्यू टीमच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील खडपी येथे रात्रीच्या सुमारास लोकवस्ती जवळ असलेल्या चिंचेच्या झाडाला अचानक भीषण आग लागली. त्यानंतर तातडीने झाडालगत असलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून स्थानिक ग्रामस्थ व नरवीर रेस्क्यू टीम, अग्निशामक बंब यांच्या मदतीने आग पूर्णतः विझवण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत कापडे बुद्रुक कार्यालयाजवळ असणाऱ्या जुन्या वडाच्या झाडाला देखील आग लागली असून आग विजवण्यात आलेली आहे. पोलादपूर तालुक्यात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या आहेत. सदर घटना घडल्यानंतर तहसीलदार कपिल घोरपडे व त्यांचे सहकारी तसेच गटविकास अधिकारी धनंजय जगताप, पोलीस प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.