सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील इंदापूर येथून राहते घरातून आई व मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना सोमवार, दि. १९ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संजय मनसुक चावडा (वय-३५) रा. सहकारी नगर, इंदापूर ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील अज्ञात आरोपी याने फिर्यादी यांची पत्नी नैना संजय चावडा (वय-३०) रा. सहकारी नगर इंदापूर, ता. माणगाव उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, रंग गोरा, अंगाने माध्यम, केस काळे लांब, अंगात गुलाबी रंगाचा ड्रेस व गुलाबी रंगाचा पायजमा, पायात काळ्या रंगाची चप्पल, हातामध्ये गुलाबी रंगाची छोटी पर्स व मुलगा देवांश संजय चावडा (वय- ८ महिने) वर्णन रंग गोरा, हिरव्या काळ्या रंगाचा टीशर्ट व त्याच रंगाची हाफ पॅन्ट यांना अज्ञानपणाचा फायदा घेऊन फूस लावून कोठेतरी पळवून नेले आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं. २००/२०२३ भादंवि संहिता कलम ३६३ प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री. लहांगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. दोडकुलकर हे करीत आहेत.