पोलीस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाहतूक शाखा झोपी गेली का? प्रवाशांचा सवाल
मिलिंद माने
महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूल व सर्विस रोड सायंकाळी दारूचे अड्डे बनत असल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर संध्याकाळी सातनंतर खुलेआमपणे पाहण्यास मिळत असतानाही राष्ट्रीय महामार्ग खाते, महामार्ग वाहतूक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी झोपी गेलेत का? असा सवाल महामार्गावरून प्रवास करणारे असंख्य प्रवासी या खात्याला विचारीत आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील नागोठण्यापासून ते कशेडी घाटापर्यंत असणारे उड्डाणपूल व सर्विस रोड यावर खुलेआमपणे सायंकाळी सातनंतर दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांना या जागा उपलब्ध होत आहेत. मात्र, महामार्गावरील उड्डाणपूल व सर्विस रोड या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वीजव्यवस्था नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन खुलेआमपणे दारू पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग राजरोसपणे त्याचा वापर करीत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या उड्डाणपुलाला लागून अनेक ठिकाणी सर्विस रोड गावात जाण्यासाठी बनवण्यात आले आहेत. मात्र, या उड्डाण पुलावर दारू व बियरच्या बाटल्या व शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या व मद्य प्राशन करताना लागणाऱ्या अन्नपदार्थांची पाकीट सैरावैरा पडल्याचे पाहण्यास मिळत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूल व सर्विस रोडवर दारू प्राशन करण्यास बसणारे दारुडे हे मोठ्या प्रमाणावर संध्याकाळी सातनंतर रात्री बारा वाजेपर्यंत मद्य प्राशन करत खुलेआमपणे बसत असताना व महामार्गावर जाणारी वाहने भरधाव वेगाने जात असताना एखाद्या वाहनाला चुकून अपघात झाला व ते वाहन मद्यप्राशन करणाऱ्याच्या अंगावर गेले तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता असताना हे मद्यपी मात्र नशा करून त्या सर्विस रोडवर व उड्डाण पुलावर आपला कार्यक्रम न चुकता दररोज करीत असताना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व ज्या कंपनीकडे या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आहे ती कंपनी तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी, महामार्ग वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस प्रशासन झोपी गेले का? असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणारे असंख्य प्रवासी शासनाला विचारीत आहेत.
