जेएनपीएच्या रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे वाहतूक कोंडी
अनंत नारंगीकर
उरण : जेएनपीए-पळस्पे मार्गावर एमटीएचएल इंटरचेंज खाली एक ऑईलचा टँकर पलटी झाल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरले होते. एकंदरीत शिवडी – न्हावा शेवा सी लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील चिर्ले गावाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
गुरुवारी (दि. २८) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. या टँकरमधुन सांडलेल्या तेलामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता संपुर्ण काळा झाला होता. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा टँकर ऑईलचा नसुन त्यामध्ये पातळ डांबर होते. सांडलेल्या डांबरावरून अवजड वाहने गेल्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता काळा झाला होता. डांबर असल्यामुळे वाहने घसरून अपघात झाला नाही. परंतु खबरदारी म्हणून या रस्त्यावरून वाहने सावकाश चालविण्यास सांगण्यात आले होते. सध्या हे रस्त्यावर सांडलेले डांबर काढण्याचे काम सुरू आहे.