बाजारपेठेत एकच गर्दी, नगरपंचायत अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग विझवली
सलीम शेख
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत एका इमारतीच्या छतावर असणाऱ्या मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, माणगाव बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हा टॉवर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील छतावर असल्याने मनुष्यबळाला ही आग विझवण्यासाठी यश आले नाही. पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तातडीने माणगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर कांही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ही आग विझवण्यात यश आले.
मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठेत वीज मंडळ सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयावरील छतावर असणाऱ्या एका मोबाईल टॉवरला ता. २८ डिसेंबर रोजी गुरुवारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक या टॉवरला आग लागल्याचे बाजारपेठेतील कांही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. ही वार्ता माणगावात पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. तत्काळ या घटनेची माहिती माणगाव पोलिसांना समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी तत्काळ माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांना कळवली त्यानंतर लगेच माणगाव नगरपंचायतीचे अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले.
थोड्याच अवधीत मुंबई- गोवा महामार्गावर माणगाव बाजापेठेत वाहतूक कोंडी असताना माणगाव वाहतूक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या वाहनाला बाजारपेठेतून रस्ता काढीत वाट मोकळी करीत घटनास्थळी वेळेत पोहोचवले. तोपर्यत आग अधिकच वाढत होती. तत्काळ या अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे सुरु करून मोबाईलचा उंच टॉवरवरील आग विझवली. आणि नागरिकांनी एकच सुटकेचा निश्वास सोडला. या इमारतीखाली बँक ऑफ इंडिया, खाजगी हॉस्पिटल, दुकाने असल्याने पुढील अनर्थ टळला. बाजारपेठेतील मोबाईल टॉवरला आग लागल्याची माहिती माणगाव पोलीस वाहतूक शिवराज बांडे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून टॉवरखाली असणारा जनरेटर बंद करण्यात यश मिळवले. अन्यथा या जनरेटरचा आगीने स्पोट झाला असता. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. तसेच माणगाव पोलीस ठाण्याचे श्रीनिवास साबळे, गोपनीय पोलीस सोमनाथ डोईफोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले तसेच बाजारपेठेतील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले.