घन:श्याम कडू
उरण : पाऊस कमी पडल्याने घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटकांना यंदा लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. तरी पाणी पुरवठा करण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी घारापुरी ग्रामपंचायतने उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी पुरती खालावली असून नवीन वर्षात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे रहाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जागतिक कीर्तीच्या समजल्या जाणाऱ्या घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर अशी तीन गावे आहेत. या बेटावर जगप्रसिद्ध कोरीव लेण्या पाहण्यासाठी हजारो देशी-विदेशी पर्यटक येत असतात. या पर्यटकांमुळेच बेटावर स्थानिकांचे छोटेमोठे लघुउद्योग सुरू आहेत. या सर्वांना पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण या परिसरात आहे. दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणात पाणीसाठाही मर्यादित राहिलेला आहे.या महिन्याअखेरच धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठून पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बेटावरील तीन गावे व हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचा पाणी प्रश्न गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घारापुरी हे बेटाच्या चारही बाजूला समुद्र असल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. तर ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही. बेटावरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच मीना भोईर व उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी समीर वठारकर यांच्याकडे केली आहे.
