दोन दशके उलटून पायाभूत सुविधांची वानवा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवरील रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून पुरती दुर्दशा झाली आहे. श्रीवर्धन-बोर्लीपंचतन या मुख्य मार्गावर असणाऱ्या गावातील रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना याच दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून गेली अनेक वर्षे खडतर प्रवास करण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील लहान-मोठी अनेक गावे मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या सोयीचा विकास करण्याचा विसर बहुदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पडला आहे. बोर्लीपंचतन शहराला लागून असणाऱ्या कार्ले आदिवासीवाडीवर जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. कारण या रस्त्याची दुरुस्ती गेली अनेक वर्षे प्रशासनाने केलीच नाही.
त्यात आदिवासी वाडीत एखादा नागरिक आजारी पडल्यास वाहन येण्याची सोय उरली नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एकमेव रिक्षावर अवलंबून रहावे लागते. मात्र, खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालकही या भागात येण्यास नकार देतात. त्यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पायीच प्रवास करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याची प्रतिक्षा असताना प्रशासनाने पुढील रस्त्याचे डांबरीकरण न करता सिमेंट काँक्रीटचा केल्यास हा रस्ता अधिक काळ टिकेल, अशी मागणी नागरिक करत आहेत.
गेली कित्येक वर्ष वाडीवरील रस्ता दुर्लक्षित आहे. त्यामुळे येथे रिक्षा सकट कोणतेच वाहन येत नाही. तसेच अचानक कोणी गंभीर आजारी पडला तर दवाखान्यापर्यंत न्यायचं कसं? असा प्रश्न कुटुंबियासमोर उभा राहिला आहे.
-शशी पवार, गाव अध्यक्ष
“साहेब, रस्त्याची अजून किती वाट पाहायची”
पंधरा ते वीस वर्षापूर्वी रस्ता बनला. त्यानंतर आजमितीस रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. याबाबत श्रीवर्धन तालुक्याच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अभियंता प्रवीण मोरे यांना विचारले असता, प्रस्तावित रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, अशीही माहिती दिली.