प्रतिनिधी
माणगाव : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांपैकी एक, माणगाव येथील पत्रकार सलीम शेख यांना भाई जगताप मित्र मंडळ रायगड, काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड, मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांच्यातर्फे पत्रकारितेचा राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना तशा आशयाचे पत्र फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. उमेश ठाकूर यांच्या सहीनिशी देण्यात आले आहे. सलीम शेख यांना उपरोक्त संस्थांकडून राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर माणगाव शहर व तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार सलीम शेख यांची माणगाव तालुक्यात झुंझार व निर्भीड पत्रकार म्हणून ओळख आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजमानस स्वस्थ आणि जिवंत राखण्याचे काम या स्तंभाचा वसा घेणारे पत्रकार करीत असतात. पत्रकारितेचे हे व्रत गेली अनेक वर्षे सलीम शेख हे अविरत व अखंडपणे आणि ते देखील निर्भीडपणे सांभाळत आहेत. प्रस्थापित सत्तेला आहारी जाऊन नंदीबैला सारखी मान डोलवणाऱ्या काळात शेख यांच्यासारख्या लढवय्या पत्रकारामुळेच लोकशाहीभिमुख पत्रकारिता तग धरून आहे. ते पत्रकारितेबरोबरच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अद्य शिक्षिका कवियत्री सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त भाई जगताप मित्र मंडळ रायगड,काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड, मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट रायगड यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत सातिर्जे मैदान अलिबाग-रायगड येथे सायंकाळी ठीक ५:३० वाजता युवक मार्गदर्शन तथा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पत्रकार सलीम शेख यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याअगोदर शेख यांना शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वस्तुनिष्ठ व जनजागृतीपर लेख व बातम्या दिल्याने कोकण व जिल्हास्तरीय पुरस्काराने शासनातर्फे गौरविण्यात आले आहे. त्यांना राजिपचा रायगड भूषण पुरस्कारही मिळाला असून आतापर्यंत जवळपास ७५ राज्यस्तरीय, कोकण विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.