अर्थपूर्ण व्यवहाराने सर्व नियम पायदळी?
काही अधिकाऱ्यांकडून वरिष्ठांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार!
घन:श्याम कडू
उरण : उरण पालिका परिसरात अनेक अवैध बांधकामे सुरु आहेत. यात पालिका प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांनी कानाडोळा केलेला आहे. काही लोकप्रतिनिधी नगरसेवकांचासुद्धा या बांधकामांना चालना देण्यात येत असल्याची चर्चा उरण शहरात जोर धरु लागली आहे. चिरीमिरी करुन जाणीवपूर्वक अर्थपुर्ण दुर्लक्ष पालिका प्रशासनाकडून होत असल्याची तक्रार व आरोप शहरातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर या बेकायदा बांधकामा बाबत सामाजिक संस्थांनी तक्रारी केल्या आहेत. सात मजली नवीन इमारत उभारताना चारही बाजूने अग्निशमन दलाची गाडी फिरण्यासाठी रस्ता असणे बंधनकारक असतानाही बिल्डर लॉबीने साधी पार्किंगची सोय केली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नगरपालिका बांधकाम विभाग अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता हे बंधनकारक नसल्याचे उत्तर देऊन हात झटकत आहेत. याबाबत सामाजिक संस्था महारेराकडे तक्रार करून दाद मागणार आहेत.
आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खाते अशी अवस्था अधिकाऱ्यांनी उरण पालिकेची करून ठेवली आहे. काही कर्मचाऱ्यांना अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठीच ठेवल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. राज्यातील बहुतांश शहरांत कोणालाही कसल्याही प्रकारचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी संबंधित पालिकेची रितसर परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी परवानगी देताना संबंधित पालिका अनेक गोष्टी व कागदपत्रे पडताळून पाहते आणि मगच सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर बांधकाम सुरू करण्याची रीतसर परवानगी देण्यात येते. पण उरण पालिकेत असे कोणतेही नियम पाळले जात नाहीत.
विकासकाने मंजूर नकाशाप्रमाणे व स्थापत्यशास्त्राच्या नियमानुसारच बांधकाम झाल्याची व प्रचलित नियम आणि अटी यांची पूर्तता केली असल्याची खात्री केल्यावरच पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमानपत्र दिले जाते परंतु जेथे कोणतेही नियम न पाळता, कोणतीही परवानगी न घेता संपूर्णपणे बेकायदा बांधकाम केले जात आहेत. अशीच बांधकामे उरण पालिका क्षेत्रात सुरु झालेली आहेत. अशा पद्धतीने उरण पालिका हद्दीमध्ये बेकायदा बांधकामे सर्रास काही महिन्यांपासून सुरु आहेत.
शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट चालू आहे. अभियंता, विकासक, काही नगरसेवक व बांधकाम जागामालक यांच्या अर्थपुर्ण मिलीभगतमुळे अशा प्रकारच्या बांधकामास सील न लावता फक्त नोटीस कागदांचा आवक जावक करून अर्थपूर्ण व्यवहार करण्यासाठीच हे शस्त्र वापरात आहेत. गेली एक वर्षापासून अनेक बांधकाम झाली असून या त्यातील अनेक बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे तसे पुरावे तक्रारदारांकडे असल्याचे समजते. नियमांचे उल्लंघन केलेल्या अवैध व अनधिकृत अशा बांधकामांस तात्काळ कायमस्वरुपी सील लावण्याची मागणी तक्रारदारांनी केली असल्याचे वृत्त आहे. बांधकामावर तात्काळ कायमस्वरुपी सील न लावल्यास यांस जबाबदार पालिका अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी नगरसेवकांची तशी तक्रार महारेरा, जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्रालय, सचिव यांच्याकडे करणार असून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या अनधिकृत बांधकामाने मुख्याधिकारी यांची प्रतिमा मलिन होत असून ती काही अधिकारी यांच्याकडून केली जात आहे. त्यांच्याकडे या बेकायदा बांधकामा बाबत पत्रकारांनी तक्रार केली आहे. याबाबत अधिकारी वर्गाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही. यावरून या कर्मचाऱ्यांना वरदस्त असल्याशिवाय ही बेकायदा बांधकामे होत नाहीत अशा संशय बळावत आहे.
उरण शहरातील नियमांची पायमल्ली करून बेकायदेशीर बांधकामे उभी रहात आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत त्यांची पाठराखण करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विरोधात महारेराकडे तक्रार करून ठोस कारवाईची मागणी सामाजिक संस्थाकडून केली जाणार आहे.
उरण नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या सर्व बांधकामांची महारेराने पहाणी करून दोषींवर कडक कारवाई करून ती जमीनदोस्त करून बिल्डरांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावेत.
-संदेश ठाकूर