शशिकांत मोरे
धाटाव : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी गर्भगृहामध्ये पुजन करण्यांत आलेले अक्षता कलशाचे रोह्यात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंगल अक्षता कलशांचा दर्शन सोहळा श्रीराम मंदिर रोहा येथे आयोजित करण्यात आला होता.
रोह्यात श्री राम मारुती चौक, मेहंदळे हायस्कूल, सागर डेअरी, रोहा नगरपरिषद ते पुन्हा श्री राम मारुती चौक अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी बहुसंख्य हिंदू बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभा यात्रेतील हिंदू बांधवांची वेशभूषेने अनेक जण आकर्षित झाल्याचे दिसून आले. रोह्यातील स्फूर्ती प्रतिष्ठान ढोल ताशा पथक यांनी सुद्धा सहभाग दर्शविला. प्रभू रामचंद्रांच्या महाआरती नंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या यांचे रोहा तालुका कार्यालयाचे सुद्धा आज उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी संजीव कवितके, किसन घाग, रोहा तालुका भाजपाचे अध्यक्ष अमित घाग, रोशन चाफेकर, विलास डाके, वैभव कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ, मयूर दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. रोहा तालुक्यातील १६५ गावांमध्ये जाऊन कलशातील अक्षता वाटण्याचे काम उद्यापासून सुरू करणार आहेत. हे अभियान २ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत असेल असे आयोजकांनी सांगितले. तरी येणाऱ्या २२ तारखेला प्रत्येक गावोगावी हिंदू बांधवांनी एकत्र येत घरोघरी दिवे लावून भजन कीर्तन करून दिवाळी सारखा सण साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले.