किरण लाड
नागोठणे : महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी, समस्त भक्तजनांना नवसाला पावणारी, नागोठणेकरांची ग्रामदेवता माता जोगेश्वरीच्या मूळ स्थानावर शांती होम व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वयंभू, समस्त भक्तांच्या हाकेलाधावणारी, जोगेश्वरी मातेचे पूर्वेकडील डोंगरावरील मूळस्थान घरळी येथे पौष शुध्द दूर्गाष्टमी, गुरुवार, दि. 18 जानेवारी या दिवशी शांती होम हवन व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. नागोठणे गावाची ग्रामदैवता माता जोगेश्वरी मातेबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते. ही माता स्वयंभू प्रगट झालेली आहे. मुरावाडी, नागोठणे येथील मातेचे भक्त हिरु ताडकर हे आपली गुरे नित्यनेमाने पूर्वेकडील जंगलात चरायला घेऊन जात असत. त्यावेळी तेथील भागात आपल्याला कोणीतरी आवाज देतोय असा भास त्यांना व्हायचा. पण ताडकर धिराचे होते. एके दिवशी हिरु ताडकर रात्री झोपले असता माता जोगेश्वरी त्यांच्या स्वप्नात आली आणि त्यांना दृष्टांत दिला कि, पूर्वेकडील डोंगरावर जेथे घरळी आहे तिथे तुला मी मूर्ती स्वरुपात आढळेल. तेथून तू मला तुझ्या डोक्यावर घेऊन चल आणि ज्या भागात तुला मी जड लागेल तिथे तू माझी स्थापना कर. असा दृष्टांत देवीने दिल्यावर हिरू ताडकर यांना आनंद झाला. सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर आपली गुरे चारायला त्या भागात घेऊन गेले. देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्याप्रमाणे तेथे देवीची तेजोमय अशी स्वयंभू मूर्ती आढळून आली. हिरु यांना आनंद झाला. त्यांनी भक्तीभावाने मातेला नमस्कार केला आणि दृष्टांत दिल्याप्रमाणे मूर्तीला डोक्यावर घेऊन नागोठणे नगरीच्या दिशेने झपाझप चालत निघाले. नागोठण्यात प्रवेश केल्यावर तीन तळ्यांच्या ठिकाणी आल्यावर डोक्यावर असणारी देवीची मूर्ती जड लागू लागली. पण देवीने दृष्टांतामध्ये सांगितले होते कि, जिथे जड लागेल तिथेच मला डोक्यावरून हळूच खाली उतर आणि माझी स्थापना कर. पण ताडकर यांना देवीचा डोक्यावर असणारा भार असह्य झाला. त्यांनी उभ्यानीच देवीची पाषाण मूर्ती टाकली. तीथेच मातेचे भक्त हिरु ताडकर यांना मोक्ष प्राप्त झाला. अशी या स्वयंभू, नवसाला पावणारी जोगेश्वरी मातेची आख्यायिका सांगितली जाते.
तीन तलाव बाजूला आणि मध्ये माता जोगेश्वरी, भैरवनाथ व व्याघ्रेश्वर महाराजांचे मंदिर नागोठणे, मुरावाडी ग्रामस्थांनी बांधले. नंतर या जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार होवून त्याचे रुपातंर एका भव्य अशा नवीन मंदिरात झाले. अशा प्रकारे नवसाला पावणाऱ्या जोगेश्वरी मातेच्या मंदिरात दरवर्षी दोन उत्सव साजरे होत असतात. एक अश्विन महिन्यातील नवरात्रौत्सव आणि दुसरा चैत्र पौर्णिमेला येणारा पालखी उत्सव हे दोन उत्सव नागोठणेवासिय मोठ्या भक्तिभावाने व आनंदात, उत्साहात साजरा करीत असतात. दरवर्षी पूर्वेकडील डोंगरावर घरळी येथील मातेच्या मूळ स्थानावर पौष महिन्यातील शुध्द दूर्गाष्टमीला होमहवन व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन ग्रासस्थ मंडळ व महिला मंडळ खडकआळी करीत असतात. यावेळी मातेच्या मूळ स्थानावरील डोंगराच्या पायथ्याशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळीही १८ जानेवारीला श्री सत्यनारायणाची महापुजा त्याचबरोबर महिलांसाठी हळदीकुंकू व श्री संत सेवा मंडळ, नागोठणे यांचे हरिपाठ, भजन असे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन भाविकांसाठी करण्यात आले आहे. या धार्मिक उत्सवाच्या दिवशी हजारो भाविक नागोठणे रेल्वे स्थानकासमोर डोंगरावर देवीच्या मूळ स्थानावर दर्शनासाठी सकाळपासून येत असतात. यावेळी भाविकांची चोख व्यवस्था ग्रामस्थ मंडळ खडकआळी करीत असतात.