• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीला भ्रष्टाचाराची कीड!

ByEditor

Jan 9, 2024

विकासकामांची चौकशी करण्याची सचिन डाऊर यांची मागणी

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील गर्भ श्रीमंत म्हणून ओळख असणाऱ्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत १५वा वित्त आयोग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. तसेच रहिवाशांकडून पाणी बिल भरणा करण्यात आला असताना एमआयडीसीच्या बिलापोटी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीने ९ कोटी १५ लाखांची रक्कम थकवली आहे. तरी चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चाणजे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांनी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. वाठारकर यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रकात नमूद करताना सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांनी सांगितले की, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत ही उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमचे आजोबा माजी आमदार कै. कानूजी डाऊर तसेच माजी सरपंच, उरण पंचायत समितीचे माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. रमेश कानूजी डाऊर यांनी वारंवार शासनस्तरावर प्रयत्न केले आहेत. मात्र, सध्याचे चाणजे सरपंच, लोकप्रतिनिधी हे रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी शासनाच्या १५ वा वित्त आयोग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामात हेराफेरी करून निधी हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पाणी पुरवठा संदर्भातील बिलापोटीची रक्कम हि रहिवाशी ग्रामपंचायतकडे भरणा करत असताना, सदर ग्रामपंचायतीने एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्याची बिलाची ९ कोटी १५ लाखांची रक्कम थकवली असल्याची माहिती समोर येत आहे.

तरी चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषी सरपंच व ग्रामसेवक यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांनी केली आहे. यावेळी करंजा ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष देविदास थळी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रविशेठ म्हात्रे, आपचे अध्यक्ष संतोष भगत तसेच चव्हाण, मच्छीमारांचे नेते जयेंद्र कोळी उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!