• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उत्सव अयोध्येचा आनंद चिरनेरकरांचा!

ByEditor

Jan 22, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
प्रभु श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला आहे. त्याचे औचित्य साधून चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातील श्री राम मंदिरात अयोध्याहून आणलेल्या श्री रामाच्या मुर्तींचे दर्शन रामभक्तांना लाभले असून श्री राम मंदिरात महायज्ञकुंड, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्सव अयोध्येचा आनंद चिरनेरकरांचा अशी प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटू लागली आहे.

भगवान श्री रामाला विष्णूचा अवतार मानले जाते. भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी त्रेतायुगात श्रीराम म्हणून मानव अवतार घेतला. प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. कारण त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसूनही प्रतिष्ठित जीवनाचे उत्तम उदाहरण मांडले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला आदर्श सोडला नाही आणि जीवन सन्मानाने जगले. त्यामुळेच त्यांना सर्वोत्तम पुरुषाचे स्थान देण्यात आले आहे.

अशा लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. २२) लाखो मान्यवरांच्या, भक्तगणांच्या उपस्थित पार पडला. त्या सोहळ्याचा एक भाग म्हणून उरण शहर, तालुक्यातील अनेक गावांमधील मंदिरात पालखी सोहळ्यासोबतच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच चिरनेर या ऐतिहासिक गावात श्री राम जन्म उत्सव सोहळा गेली २०० वर्ष साजरा केला जातो. अशा श्री राम मंदिर जिर्णोद्धार कमिटीने अयोध्याहुन आणलेल्या श्री राम मंदिरातील मूर्तींचा अभिषेक सोहळा सकाळी चिरनेर गावातील दानशूर व्यक्ती राजाशेठ खारपाटील या दांपत्याच्या हस्ते पार पडला. यावेळी मंदिरात काकड आरती, हरिपाठ, भजन, महायज्ञकुंड या सारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत अयोध्या नगरीप्रमाणे चिरनेर उरण नगरीही श्री रामाच्या नावाने दुमदुमली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!