सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील नाणोरे गावचे हद्दीत एकता पेट्रोल पंपाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पिकअप टेम्पोने विरुद्ध दिशेला येत समोरून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सदरील अपघात सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी पहाटे १:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद मोहम्मद नईम गफारमिया (वय-३६) रा. कळंबोली मूळ. रा. झारखंड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताची फिर्याद देणारे ट्रक चालक मोहम्मद नईम गफारमिया हे त्यांच्या ताब्यातील अशोक लेलंड ट्रक क्र. एमएच ४६/सीएल ७५५३ हि गाडी जयगड जिल्हा रत्नागिरी ते कळंबोली नवी मुंबई अशी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्यावर मुंबई बाजूकडून येणारा पिकअप टेम्पो क्र. एमएच ०६ बीडब्लू या गाडीवरील चालक याने त्याच्या ताब्यातील पिकअप विरुद्ध दिशेला आणल्याने समोरून ट्रकला धडक लागली. या अपघातात टेम्पो चालक रवी दादासो पवार (वय-२६) व रोहन रघुनाथ भानसे (वय-१८) दोन्ही राहणार ढालघर, ता. माणगाव दोघे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजि. क्र. २/२०२४ याप्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप करीत आहेत.