घन:श्याम कडू
उरण : श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे संपन्न झाला आहे. या सोहळ्यानिमित्ताने उरण राममय झाले होते. तालुक्यातील प्रत्येक मंदिरात, गावात हा आनंदोत्सव साजरा होत होता.
उरण शहरात श्रीराममय वातावरण निर्माण होऊन भव्यदिव्य रॅली काढण्यात आली. यावेळी प्रभू श्रीरामाचा जयघोष करीत रॅली शहरभर फिरवून गणपती चौक राम मंदिरात रॅलीचे विसर्जन झाले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई रॅलीत सहभागी झाली होती. पाचशे वर्षाने श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आयोध्या येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात होत आहे. सारा देश हा रामाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. उरण शहरातही सोहळ्याच्या निमित्ताने सारेजण राममय झाले आहेत. त्यामुळे शहरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्ताने तालुक्यातील हिंदू समाज हा एकत्रित आला आहे.

ही रॅली संपूर्ण शहरात फिरवून पुरातन श्री राम मंदिरात दाखल झाली. श्री रामाच्या नावाचा जयघोष रस्त्यावर दुमदुमला होता. यावेळी रामभक्त पारंपरिक वेशभूषेत आणि हातात झेंडा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. शहरासह तालुक्यातील अनेक मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर, गावात रांगोळीने रामाच्या भक्तीत सर्वजण तल्लीन झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

यानंतर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते बाबरी मशीद पाडण्यासाठी सहभागी होऊन कारावास भोगलेल्या कारसेवकांचा श्री रामाची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर राम मंदिरात आरती होऊन महाप्रसादाचा आस्वाद घेण्यात आल्यानंतर कार्यक्रम समाप्त झाला. या रॅलीत सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळपासून उरणमधील संपूर्ण बाजारपेठ, मासळी, मटण व चिकन विक्रेते यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Jay shree ram