• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे केएमजी विभागातील कारसेवकांचा श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार

ByEditor

Jan 23, 2024

किरण लाड
नागोठणे :
अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमीच्या मुक्तीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनात भाग घेणाऱ्या व्यक्तींना कारसेवक म्हणून संबोधले जात होते. कारसेवक म्हणजे मनात कोणताही क्लेश न ठेवता, निःस्वार्थी बुद्धीने परमेश्वराच्या कार्यासाठी स्वतःच्या हातांनी सेवा करणारा सेवेकरी. सन 1990 व 1992 या दोन वर्षी अयोध्येत कारसेवा झाल्या होत्या. सन 1990 व 1992 मध्ये कारसेवेसाठी सामिल झालेल्या केएमजी विभागातील कारसेवकांचा यथोचित सत्कार श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट रोहा यांच्यावतीने प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधुन करण्यात आला.

केएमजी विभाग हा नागोठण्यातील सर्वात मोठा विभाग आहे. केएमजीचा सार्वजनिक गणेशोत्सव, गोविंदा विभागात प्रसिद्ध आहे. येथील लोक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत असतात. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्या कारसेवा झाल्या त्यात नागोठण्यातील तसेच विभागातील कारसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अनेक संकटे आली. अनेक कारसेवकांनी आपले बलिदान दिले. पण कारसेवक मागे हाटले नाहीत. अयोध्येतील कारसेवेसाठी केएमजी विभागातील रामभक्त, सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर नागोठणेकर, मोहन भगत तसेच अनिल भगत सहभागी झाले होते. तसेच या कारसेवेसाठी विशेष सहाय्य सामाजिक कार्यकर्ते अनंत जगताप यांनी केले होते. या सर्व रामभक्त कारसेवकांच्या अथक प्रयत्नाना, संघर्षाला यश येऊन थोडेथोडकी नव्हे तर 500 वर्षांनी अयोध्येत भव्य असे श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे. त्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधुन कारसेवकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारसेवकांचा सत्कार दि. 22 जानेवारी या आनंदाच्या दिवशी श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट रोहा तसेच नागोठणे शिवसेना व केएमजी विभाग ग्रामस्थ यांच्या वतीने या कारसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याने केएमजी विभागातील कारसेवक भारावून गेले होते.

प्रभू श्रीराम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी केलेल्या करसेवेचे आज फळ मिळाले असून अयोध्येत प्रभू रामाच्या भव्य मंदिर उभारणीत आमचाही खारीचा वाटा आहे. या शुध्द भावनेने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व भक्ती ओसांडून वाहत होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!