• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महावितरणची करोडो रुपयांची केबल गेली चोरीला; महावितरणचे दुर्लक्ष

ByEditor

Jan 25, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
उरण पुर्व विभागातील गावांना, कंटेनर यार्ड आणि व्यावसायिकांना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी खोपटा पुलावरून टाकण्यात आलेली एचटी (हाय जंक्शन) केबल रात्रीच्या अंधारात कापून नेल्याची घटना बुधवारी (दि. २४) घडली आहे. त्यामुळे करोडो रुपये किंमतीची विद्युत वाहक केबल चोरीस गेली की महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांनी लंपास केली अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये वर्तविण्यात येत आहे.

उरण महावितरण कंपनीच्या माध्यमातून पुर्व विभागातील गावांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा हा रात्री अपरात्री वारंवार खंडित होत असल्याने या विभागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी वारंवार महावितरण कार्यालयाकडे मागणी केली. महावितरण कंपनीने पुर्व विभागातील गावांसाठी सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सुमारे आठ कोटींची नव्याने एचटी (हाय जंक्शन) केबल टाकण्याचे काम ठेकेदारांच्या माध्यमातून केले आहे. परंतु, सदर केबल बुधवारी रात्रीच्या अंधारात कापून नेल्याची घटना घडली आहे. एकंदरी उरण पुर्व विभागात घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली असताना विद्युत पुरवठा करणारी करोडो रुपये किंमतीची केबल कोणी कापून नेत असेल तर यासंदर्भात महावितरण कंपनीचे अभियंता कोणत्या प्रकारची ठोस कारवाई करणार याकडे नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सदर पुर्व विभागातील गावांना विद्युत पुरवठा करणारी नवी केबल चोरीस गेली नसून ठेकेदारांनी नेली आहे की काय याची माहिती घेतो.

-विजय सोनवणे
उप अभियंता महावितरण कार्यालय उरण

उरण पुर्व विभागातील गावांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी खोपटा पुलावरून करोडो रुपये खर्च करून केबल टाकण्याचे काम महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते. त्या विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलमधून सुरळीत विद्युत पुरवठा न करता कोणी कापून लंपास करत असेल तर अशा इसमांवर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी.

-सत्यवान भगत
उरण तालुकाध्यक्ष मनसे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!