• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोटरसायकल आणि एसटी बस अपघातात बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी

ByEditor

Jan 28, 2024

मिलिंद माने
महाड :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रविवारी सकाळी महाड तालुक्यातील दासगाव गावच्या हद्दीत निसर्ग हॉटेलसमोर १०:३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि एसटी बसमध्ये सामोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक तरुणी ठार झाली तर एक जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड तालुक्यातल्या दासगाव गावाजवळील निसर्ग हॉटेल जवळ नितेश शंकर हिलम आणि त्याची बहीण छाया शंकर हिलम दोघे राहणार टोळ त्यांच्या मालकीच्या मोटरसायकल क्रमांक एमएच ०६ – एएक्स ३२१४ वरून महाड ते टोळ असा प्रवास करत असताना दासगाव गावाजवळ आल्यानंतर त्यांची गोरेगाव ते महाड जाणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच ०७ – सी ७४५४ हिला समोरासमोर जोराची धडक बसली. अपघातानंतर मोटरसायकलवरील दोन्ही जखमींना ग्रामस्थांनी महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचार दरम्यान छाया हिलम हिचा मृत्यु झाला. जखमी नितेश हिलम याला पुढील उपचारासाठी माणगाव येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव गावाजवळ झालेल्या या अपघातामध्ये एसटी बस चालकाने मोटरसायकलस्वाराला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, मोटरसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर चढली. यामुळे बसला मिळालेल्या दणक्याने बसचा दरवाजा जाम झाला आणि बसमधील सर्व प्रवासी काही काळ अडकून पडले. मात्र, संकटकालीन दरवाज्यातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र, अनेक वयोवृद्ध महिलांना बाहेर काढण्यास ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!