एक दिवसात दोन अपघात वॅगनआर कार आणि ट्रक अपघातात पाच जखमी
मिलिंद माने
महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर महाड तालुक्यातील दासगाव जवळ एकाच दिवसात दोन अपघात झाले. मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यु झाला तर ट्रक आणि वॅगनार कार अपघातात कारमधील पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दासगावजवळ दोन अपघात झाले. सकाळी एसटी आणि मोटरसायकल अपघातात दोन जण मृत्यूमुखी पडले तर या अपघाताच्या काही अंतरावर रात्री १०: ४५ वाजण्याच्या सुमारास दापोली ते पुणे जाणारी वॅगनार कार क्रमांक एमएच १४ एफएस ९८४६ आणि मुंबई ते महाड एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे ०१ डीझेड १८४६ मध्ये भीषण धडक होऊन या अपघातात कारचा चक्काचूर झाला आणि कारमधील रघुनाथ चिमन पालवी, प्रकाश शंकर पवार, प्राची विजय कदम, स्वाती चंद्रकांत चौधरी, चंद्रकांत सयाजी चौधरी सर्व राहणार चाकण हे गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या चुकीच्या धोरणामुळे व दिशादर्शक फलक जागोजागी न लावल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका मोठ्या प्रमाणावर चालू झाली असली तरी वातानुकूलित केबिनमध्ये बसणाऱ्या महाडमधील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकाऱ्यांना कोणते सोयरसुतक याबाबत पडले नसल्याचे या दोन घटनांवरून निदर्शनास येत आहे.