गणेश पवार
कर्जत : ग्रामपंचायत पाली, सजा भालीवडी हद्दीतील पेज नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून याबाबत रीतसर पत्रव्यवहार करून तलाठ्यांकडून पंचनामा करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी जयवंत धर्मा मसने मु. पाली पो. गौलवाडी हे आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस असूनही महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी फिरकले नाहीत असा आरोप उपोषणकर्त्यानी केला आहे.
वाळू चोरी करणाऱ्याबाबत अनेक वेळा प्रशासकीय यंत्रणेस कळवूनही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करून चोरी करणाऱ्या इसमावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने प्रशासन डोळे असूनही आंधळ्याचे सोंग घेत असल्याने केलेल्या तक्रारीला प्रशासन दाद देत नाही म्हणून बेमुदत आमरण उपोषण दि. ५/०२/२०२४ रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे सुरू केले आहे. आज दुपारपर्यंत महसूल विभागाच्यावतीने कुणीही भेट दिली नाही अथवा दखल घेतली नाही. असे उपोषणकर्ते जयवंत धर्मा मसणे यांनी सांगितले.