• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्लीपंचतन एसटी निवारा शेडचे खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

ByEditor

Feb 13, 2024

नूतन बसस्थानकाचे विस्तारीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी
निवारा शेडलगतच्या भुखंडामध्ये हिरकणी कक्ष, सुलभ शौचालय, पाणपोई तसेच दिव्यांग प्रवाशांना व्हील चेअर सुविधांची मागणी

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बोर्लीपंचतन शहरात प्रवासी निवारा शेडचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी केले. या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी नूतन बसस्थानकाच्या लगत असणाऱ्या मोकळ्या भूखंडात प्रवाशांसाठी अत्यावश्यक लागणाऱ्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

आमदार अदिती तटकरे यांनी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत बसस्थानकासाठी मिळवून दिलेल्या निधीतून या शेडची उभारणी करण्यात आली आहे. मागील तीन वर्ष एसटी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी सातत्याने होत होती. मात्र, बसस्थानकाचा तिढा सुटता सुटत नव्हता. या समस्येला वृत्तपत्रातून प्रखरतेने मांडण्यात आले. अखेर सरपंच ज्योती परकर यांच्या पाठपुराव्यानंतर लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने बसस्थानक उभे राहिले आहे.

यावेळी महमद मेमन, श्यामकांत भोकरे, सुकुमार तोंडलेकर, नंदकुमार पाटील, सुचिन किर, सरपंच ज्योती परकर, ग्रामपंचायत सदस्य सह चंद्रकांत धनावडे, प्रदीप खोपकर, अमित पाटील, सुमित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

बसस्टॉपला प्रवाशांची गर्दी

तालुक्यातील बोर्ली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ४२ गाव – खेड्यांचा तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी – जंजिरा अशी पर्यटन स्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणाऱ्या – जाणाऱ्या ८६ गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांकडे नेहमीच नागरिक प्रवास करत असतात. सोबतच एसटी प्रवासामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने या प्रवाशांना सुविधा मिळावी अशी मागणी होत आहे.

बसस्थानकाच्या सुविधांसाठी ग्रामस्थांची मागणी

एसटी प्रवासामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथे हिरकणी कक्ष बांधण्यात यावे, प्रवाशांसाठी सुलभ शौचालय अत्यंत गरजेची बाब असून, पिण्यासाठी पाणीपोई सोबतच बस स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी व्हील चेअर उपलब्ध व्हावेत अशी मागणी प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!