क्रीडा प्रतिनिधी
पोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघांनी अंतिम सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघाचा पराभव करून अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे.

दक्षिण रायगडच्या दोन संघांनी एसबीसी महाड आणि फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघांनी उर्वरित जिल्ह्यातील 10 संघांचा पराभव करून अंतिम फेरीत संघाचा प्रवेश मिळवला.नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघांनी ४० षटकांच्या समाप्तीनंतर ५ गडी गमावत २४६ धावांचा डोंगर उभा केला,सलामीवीर फलंदाज आरुष कोल्हेने चौफेर फटकेबाजी करत स्पर्धेतले स्वतःचे ३ शतक ठोकले. १३९ चेंडूंचा सामना करतांना १७ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने त्यांनी १३४ धावा काढल्या. संपूर्ण स्पर्धेत आरुष कोल्हेने ३ शतके १ अर्धशतक ठोकत ५४९ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या संघात स्थान मिळवलेल्या रोशनी पारधी हिने नाबाद ५१ धावा काढून संघाला मोलाचे योगदान दिले. फायटर्स माणगाव संघाकडून पार्थ म्हस्के याने २ तर निधीश मेहता, तनिष्क टेमकर, ऋग्वेद जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रतिउत्तरात माणगाव संघाचा डाव ३६ व्या षटकात १०५ धावसंख्येवर आटोपला. निल जाधव यांनी सर्वाधिक २२ धावा केल्या. महाड संघाकडून आरुष कोल्हे यांनी ३ तर रोशनी पारधी, यश साळुंके, प्रचिती जाधव यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूत धाडले. एसबीसी महाड संघांने सामना जिंकत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. फायटर्स माणगाव संघाला द्वितीय क्रमांक, स्पोर्टी-गो कळंबोली आणि भेंडखळ उरण संघाला तृतीय तर प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल व किक-फ्लिक क्रिकेट एरिना खोपोली संघ चतुर्थ क्रमांकावर विजयी ठरले.
संपूर्ण स्पर्धेत आपली चमक दाखवणाऱ्या आरुष कोल्हेला मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज अजय जाधव, उत्कृष्ठ गोलंदाज पार्थ म्हस्के, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक श्रेयांश शेडगे व श्रेय पाटील, स्पर्धेतील इमॅर्जिंग प्लेयर म्हणून ऋग्वेद जाधव, अमर बिके, अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून शतकवीर आरुष कोल्हे, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू निल जाधव, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक देवांश शिंदे, श्रेयांश शेडगे यांना झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण, ग्रा. पं. पोयनाडचे सदस्य सुनील पाटील, झुंझारचे सचिव किशोर तावडे, सदस्य अजय टेमकर, सुजित साळवी, अजित चवरकर, डॉ. कोल्हे, अविनाश मेहता, ॲड. पंकज पंडित, पलाश चवरकर, महाडचे प्रशिक्षक आवेश चिचकर, माणगावचे प्रशिक्षक रोहित काळे, पंच संदिप जोशी, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्यासह खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.