वैभव कळस
म्हसळा : दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटेपासून वाजता श्रींची अभिषेक पूजाविधी, दैवज्ञ समाज महिला मंडळ यांचे संगीत भजन, सिद्धीकला भजन मंडळाचे संगीत भजन, दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह जन्मोत्सवाचे आयोजन उत्साही आणि आनंदी वातावरणात आयोजन करण्यात आले असल्याचे म्हसळा दैवज्ञसमाज अध्यक्ष सुनिल उमरोठकर यांनी सांगितले.
माघी गणेशोत्सवानिमित्त रोहा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार मंदार भावे यांचे उपासना, बालोपासना, संस्कार आणि मनोपासना तसेच श्री गणेश यांच्या जन्मोस्तवावर आधारीत सुस्वर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.मंदार भावे यांनी मानवाचा जन्म ते त्याचा मृत्यू आणि उपासनेतून समाधान या मधील प्रवासाचे सविस्तर वर्णन करून मिळालेल्या मानव जीवनाचे सार्थक कसे करता येईल या बाबत भक्तांना सविस्तर प्रबोधन केले.जीवनात चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीचे जीवन सफल होते असेही कीर्तनकार मंदार भावे यांनी सांगून दुर्गुण आणि उच्छाद यांचा सर्वनाश होणे अत्यावश्यक असून घरोघरी उपासना केंद्र उभारणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मुखात मारूती स्तोत्राचे वाचन झाल्यास विनाशाचा नाशही होतो असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या उत्सवाच्या कार्यक्रमास दैवज्ञ समाज अध्यक्ष सुनील उमरोठकर, अनिल पोतदार, गौरव पोतदार, सौरव पोतदार, अशोक पोतदार (तुरुंबाडी), महेंद्र पोतदार, गौरी प्रसाद पोतदार, माजी नगरसेविका संपदा पोतदार, दादा पानसरे, महादेव कदम, श्री व सौ. रेखा धारिया आदि मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा, भजन, कीर्तन आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहेत.