अनंत नारंगीकर
उरण : उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाण्या लागत असलेली इमारत खंडर बनली आहे.त्यामुळे तिथे उंदीर, घुशी, विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या जनतेच्या आणि कार्यालया मधील कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली उरण तहसील कार्यालगत असणाऱ्या इमारतीमध्ये इंग्रज राजवटीत शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होते. मात्र त्यानंतर तेथील अनेक वर्षांपासून कार्यालयांचे कामकाजू बंद असल्यामुळे इमारत मोडकळीस येऊन बंद स्थितीत आहे. इमारतीचे दरवाजे, खिडक्या नाहीशा झाल्या आहेत. आजूबाजूला घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे सदर इमारत परिसरात उंदीर, घुशी बरोबर विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला असून इमारत संपूर्ण खंडर बनली आहे.

दिवसागणिक हजारो नागरिकांचा वावर या दोन्ही कार्यालयामध्ये होत आहे. येणारे नागरिक येथे वाहने उभी करत असतात. त्या वाहनांमध्ये विंचू, साप घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या कार्यालयामधील कर्मचारी काम करीत असताना कामामध्ये मग्न असतात याच वेळेला खिडकीतून विंचू ,साप जाऊन कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतात. त्यामुळे या खंडर झालेल्या कार्यालयाचे डीमोलेशन करुन परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक, कर्मचारी करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम उरणचे उप अभियंता नरेश पवार यांच्याकडे या इमारती संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे या इमारतीच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे कार्यालय येथे अनेक वर्षांपासून बंद आहे. इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. आजूबाजूला स्वच्छता नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उंदीर, घुशी बरोबर विंचू, सापांचा वावर वाढला आहे. येथे येणाऱ्या नागरिकांबरोबर, कर्मचाऱ्यांना कधीही सापाचा दंश होऊ शकतो. त्यामुळे सदर इमारतीचे बांधकाम पाडून परिसराची स्वच्छता करावी, तसेच शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग उरणकडे केली आहे.
-सतिश निकम
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण