अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील दिघोडे व वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (दि. २६) बेलोंडाखार खाडी किनाऱ्यावरील साकव पडण्याची दुदैवी घटना घडली आहे. त्या अपघातात निष्पाप आदिवासी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले. तरी भविष्यात अशा प्रकारची दुर्दैवी घटना न घडण्यासाठी सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खारभूमी अभिलेख विभाग पेण यांनी धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन नव्या साकवांचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी केली आहे.
धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, धुतूम व दिघोडे, वेश्वी या गावांना जोडणाऱ्या बेलोंडाखार खाडी किनाऱ्यावर मागील दहा वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून साकवांचे काम नियोजन समितीच्या फंडातून करण्यात आले होते. परंतु, जीर्ण झालेल्या साकवांकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी (दि. २६) सदर साकव पडण्याची दुर्दैवी घटना घडली. या झालेल्या अपघातात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या राजेश लक्ष्मण वाघमारे, अविनाश सुरेश मुरकुटे यांना आपला जीव गमवावा लागला. तर गुरुनाथ सदानंद कातकरी, सुरज शाम वाघमारे या दोघांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे.

सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, खारभूमी अभिलेख विभाग यांनी धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील जीर्ण झालेल्या साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन नव्या साकवांचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा नाहीतर खाडी किनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व परिसरातील आदिवासी बांधवांना पुन्हा एकदा २६ फेब्रुवारी २०२४ पुनरावृत्ती घडून आपले प्राण गमवावे लागणार आहेत अशी भीती धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. तसेच सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे नव्या साकवांच्या कामाची मागणीही केली आहे. यावेळी धुतूम गावातील नंदकुमार ठाकूर, दिपक ठाकूर, दिगंबर ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग उरण आणि सिडकोच्या अधिकारी वर्गाने तात्काळ सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पडलेल्या साकवांचे व खाडी किनाऱ्यावरील जीर्ण झालेल्या साकवांची पाहणी केली. यावेळी लवकरच लवकर सदर साकवांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असल्याचे आश्वासन दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच सुचिता ठाकूर यांना दिले आहे.
