गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील पादिरवाडी येथील राहणार व नेरळ पोलीस ठाण्याच्या आऊट पोस्ट कळंब येथे मिसिंगची नोंद असलेल्या विवाहित ललिता सचिन जुगरे (वय ३१) या महिलेचा मृतदेह चाफेवाडी येथील विहिरीत आढळून आला आहे. काही दिवसांपासून मिसिंग असलेल्या महिलेचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावरील विहिरीत आढळून आल्याने पोलिसांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. या महिलेची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न उपस्थित होत असुन, सदर महिलेच्या माहेरच्या व्यक्तींकडू हत्या असल्याचा संशय उपस्थित केला जात आहे. सदर मयत महिलेस एक ४ वर्षाचा तर एक ५ महिन्याचा अशी दोन लहान मुले आहेत.
कर्जत तालुक्यातील पादिरवाडी, पो. नांदगाव येथील विवाहीत ललिता सचिन जुगरे (वय ३१) हि दि. २६ फेब्रुवारी २०२४ च्या मध्यरात्री ते दि. २७ फेब्रुवारी २०२४ सकाळच्या सुमारास झोपलेला तिचा पती सचिन रखमा जुगरे (वय ३०) याला जाग आली असता पत्नी घरात दिसत नाही म्हणून त्याने पत्नीचा आजुबाजुला शोध घेतला. पत्नी कुठे आढळून येत नसल्याने त्याने पत्नीचे माहेरच्यांना ललिता कुठे निघुन गेल्याचे कळवले. माहेरच्या लोकांनी व पती सचिन याने ललिताचा शोध घेतला. परंतू तिचा काही शोध लागत नसल्याने पती सचिन याने दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊटपोस्ट येथे मिसिंगची तक्रार दाखल केली होती. परंतू, दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास खांडस ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी येथील विहिरीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थ यांच्या नजरेस पडले. सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलीस ठाण्यात मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे हे पोलीस टिमसह घटना ठिकाणी जाऊन सदर महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता, दि. २८ फेब्रुवारी रोजी मिसिंग तक्रार असलेली ललिता जुगरे हीचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
सदर बाब ही मयत ललिता जुगरे हिच्या पतीला व माहेरच्या लोकांना समजली असता तेही घटनास्थळी आले. नेरळ पोलीसांनी सदर महिलेचा मृतदेह हा शविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेला आहे. तर माहेरच्या लोकांकडून हत्येचा संशय उपस्थित केला असल्याने व नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून मयत ललिता जुगरे हिचा पती सचिन जुगरे, सासु हिराबाई जुगरे व बारकी नणंद यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७ /२०२४ भा.द.वि. कलम ३०६ प्रमाणे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक डब्ल्यू. एस. पांगे मॅडम या करीत आहेत.