नराधम सावत्र बापाच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गणेश पवार
कर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीत सावत्र बापाने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवली आहे. याबाबत तिच्या आईला कळल्यावर मुलीला व आईला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, अखेरीस आईने घराबाहेर पडत पोलीस ठाणे गाठले. तसेच त्या नराधम सावत्र बापाविरोधात तक्रार दाखल करत मुलीला न्याय मिळण्याची अपेक्षा केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ पोलीस ठाणे हद्दीत एक कुटुंब राहायला आले होते. त्यातील महिलेचे यापूर्वी लग्न झाले होते. मात्र, नवऱ्याशी न पटल्याने तिने दोन मुलींसह ते घर सोडले. त्यानंतर तिची ओळख सलमान असलम शेख (वय ४०) याच्याशी झाली. त्याच्यासोबत जवळीक वाढल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेऊन ती नेरळ पोलीस ठाणे हद्दीत एका ठिकाणी वास्तव्य करू लागली. त्यात सलमान याची वाईट नजर तिच्या १४ वर्षीय मोठ्या मुलीवर असल्याने मुलीची आई घरात नसल्याचा फायदा घेऊन सलमानने त्या मुलीवर अत्याचार केले. त्यामुळे ती मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली. याबाबत आईला कळल्यावर तिने संताप व्यक्त केला. मात्र त्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपी सलमानने दिल्यामुळे तिला शांत राहावे लागले. अखेरीस मुलीचा विचार करून मुलीच्या आईने आणि मुलीने नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी सलमानविरोधात मुलीने फिर्याद दाखल केली. नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ५७/२०२४ भादंवि कलम ३७६, (२)(एन)(एफ), ३७६(३), ५०६, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ अन्वये पॉक्सोची कारवाई करण्यात आली आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीसांनी दुष्कर्मी सावत्र बापाच्या मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत.
