• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चवदार तळे सभागृहावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्लास पेंटींगची दुरवस्था

ByEditor

Mar 15, 2024

मिलिंद माने
महाड :
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदरतळ्यावर सामाजिक क्रांती केली त्या चवदारतळ्याचे शासनाने सौंदर्यीकरण करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. याठिकाणी उभारलेल्या सभागृहाच्या दर्शनी भागावर तीन अर्ध गोलाकार खिडक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्लास पेंटींग बसविले आहेत. या पेंटींगची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

सन २० मार्च १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून दलितांना त्यांचा न्यायहक्क प्राप्त करून दिला. पाण्याच्या या क्रांतीची साक्ष देणारे चवदार तळे हे संपुर्ण दलीत समाजासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा काही कमी नाही. संपुर्ण देशभरातुन दलित आणि बहुजन समाज चवदार तळे पाहण्यासाठी महाडला भेट देतात. दलित समाजाची ही चवदार तळ्याबाबतची भावना लक्षात घेऊन महाड नगरपालिकेने महाराष्ट् शासनाच्या माध्यमातुन १९९४ मध्ये चवदार तळ्याचे सुशोभिकरण केले. यावेळी येथे भव्य असे सभागृह उभारण्यात आले. या सभागृहाच्या दर्शनी भागात तीन अर्धगोलाकर खिडक्या ठेऊन त्या खिडक्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत देखावे लावण्यात आले. हे देखावे सभागृहाच्या आतुन आणि बाहेरून दिसावेत म्हणुन हे देखावे ग्लास पेंटींग प्रमाणे तयार करण्यात आले होते. पारदर्शक फायबरवर ही पेंटींग करण्यात आली होती. सुमारे १८ वर्ष लोटल्यानंतर आता हे देखावे खराब झाले आहेत. त्यांचे रंग धब्बेदार झाले आहेत. त्यामुळे येथे काढण्यात आलेली चित्र विद्रुप झाली आहेत.

या सभागृृहात खाजगी आणि शासकीय दोन्ही प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी महाड नगरपालिकेचे कर्मचारी २४ तास कामावर हजर असतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उभारलेल्या स्मारकामध्ये दर्शनी भागात लावलेले त्यांच्याच जीवनावरील देखावे विद्रुप झाल्याचे कोणलाच कधी दिसले नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

महाड नगरपरिषद व राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग आता या गोष्टीकडे लक्ष देणार की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी मशगुल होणार असा सवाल आंबेडकर अनुयायी विचारत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!