• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर अभावी पडले ओस; रुग्णांची गैरसोय

ByEditor

Mar 14, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी उरणचे आमदार महेश बालदी तसेच माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सदर रुग्णालयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामीण भागातील जनता व्यक्त करत आहे.

उरण परिसरातील गरिब, गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या दोन उपचार केंद्र आहेत. ३० खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर अवघ्या तालुक्याचा भार आहे. दररोज २५० बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे. या उलट ग्रामीण भागात असलेले कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उरण परिसरातील विशेषतः ग्रामीण भागातील गरीब, गरजु रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला येत असतात.

मात्र, ग्रामीण भागातील गरीब, गरजु रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ये- जा करत असताना मात्र रात्री सात वाजल्यानंतर या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करत पनवेल, नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले आहे. तरी गोरगरीब रुग्णांना कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी उरणचे आजी आमदार महेश बालदी व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी जातीने लक्ष घालून सदर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक, मित्रमंडळी करत आहेत.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त दोनच महिला डॉक्टर कार्यरत आहेत. मात्र, दोन्ही महिला डॉक्टर रात्री सातनंतर थांबत नाही. यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

-डॉ. राजेंद्र ईटकरे
तालुका वैद्यकीय अधिकारी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!