• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा येथे साकारणार राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज

ByEditor

Mar 14, 2024

मेडिकल कॉलेजसाठी मंत्रिमंडळाची 330 कोटी रुपयांची मंजुरी; खासदार तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
बोर्ली पंचतन रॉयल स्पोर्ट्सच्या मैदान सुशोभीकरणसाठी 50 लाखाची मंजुरी
दिवेआगर 4 किमीच्या समुद्रकिनारा रस्त्यासाठी 7 कोटी 90 लक्ष रुपये मंजुरी, तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
महाराष्ट्र शासनाचे पहिले युनानी मेडिकल कॉलेज रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे होण्यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली असून पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2024-2025 मध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेल्या या मेडिकल कॉलेजचे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिवेआगर येथील सण अँड सी रिसॉर्टमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी खास बाब म्हणून 50 लक्ष रुपयाचा निधी तर दिवेआगर येथील समुद्र किनाऱ्याच्या 4 किलोमीटर रस्त्यासाठी महाराष्ट्र गृह विभागाच्या बंदर व परिवहन महाराष्ट्र सागरी मंडळातुन 7 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आज खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

महायुतीमध्ये सामील झालो तो या भागातील विकासासाठी, त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नामदार आदिती तटकरे, नामदार हसन मुश्रीफ व संपूर्ण मंत्रिमंडळाने दिलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सावर या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याठिकाणी 100 बेड्सचे हॉस्पिटल व 100 विद्यार्थी क्षमता असलेले हे विद्यालय होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तसेच रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली पंचतनच्या मैदान सुशोभीकरणसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून 50 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला असून या कामाचे भूमिपूजन त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ असलेला दिवेआगर येथील समुद्र किनाऱ्यालगतच्या सुमारे 4 किमी लांबीच्या रस्त्याला 7 कोटी 90 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे देखील भूमिपूजन खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष महमद मेमन, मुख्य प्रवक्ता शाम भोकरे, संघटक नंदू पाटील, माजी सभापती लाला जोशी, नाजीम हसवारे, दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे, माजी सरपंच उदय बापट, ग्रामपंचायत सदस्या, तसेच बोर्ली पंचतन मुस्लिम समाज अध्यक्ष महमद अली परदेशी, नागाव मुस्लिम समाज अध्यक्ष रफिक मुरतुझा, रॉयल स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष नाझीम घराडे, सचिव आखलाक उलडे, महादेव पाटील, सुजित पाटील तसेच इतर उपस्थित होते.

लोकसभेच्या जागा वाटपाबाबत खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता भारतीय जनता पार्टीचे तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीमधील जागा वाटप समन्वयाने व सन्मानपूर्वक होत असून येत्या दोन दिवसांत हे जागा वाटप निश्चित झाल्याचे पहावयास मिळेल. आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे आमच्याकडे रस्सीखेच आहे, पण जिथे रान ओसाड आहे अशा महविकास आघाडीचे जागावाटप झालेले नाही असा टोला खासदार तटकरे यांनी लगावला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!