किरण लाड
नागोठणे : येथील नावाजलेल्या रिलायन्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चशिक्षित रमेश प्रभाकर धनावडे यांनी कला व साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल दैनिक नवराष्ट्रने घेतली असून, नुकतेच पनवेल येथे झालेल्या नवराष्ट्र व नवभारत सन्मान सोहळ्यात त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रमेश धनावडे हे नागोठणे येथील नावाजलेल्या रिलायन्स कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर एचआर कार्पोरेट अफेअर्स या पदावर कार्यरत आहेत. काॅर्पोरेट अफेअर्स हे कंपनीमधील जबाबदारीचे पद असून बाह्य आणि अंतर्गत प्रक्रियेचे व्यवस्थापन तसेच इतरांशी चांगले संबंध ठेवण्याशी निगडीत आहे. रिलायन्स कंपनीमध्ये काम करीत असताना आपल्या अंगी असलेला कला व साहित्याचा छंद धनावडे यांनी चांगल्या प्रकारे जोपासला आहे. त्यांची अनेक साहित्ये प्रसिद्ध झाली आहेत. मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध 63 कवींवरील यशोगाथा, विविध दैनिकांमध्ये स्तंभलेखन, गुदगुल्या या सामाजिक तसेच राजकीय वात्रटिका, तसेच अनेक दिवाळी अंकामध्ये लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच त्यांनी अनेक शाळा, काॅलेजमध्ये प्रमुख वक्ता म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. अशा प्रसिद्ध कला व साहित्यिक रमेश धनावडे यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण हा मनाचा पुरस्कार तसेच अनेक नामांकित सामाजिक संस्थाकडूनही सन्मानित करण्यात आले आहे.
नोकरी सांभाळून आपली कला जोपसणारे धनावडे यांनी सामाजिक कार्यामध्येही चांगला ठसा उमटवला आहे. अशा कला व साहित्यिक रमेश धनावडे यांना दैनिक नवराष्ट्रने सन 2024 च्या नवराष्ट्र सन्मानाने सन्मानित केल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
