गणेश पवार
कर्जत : नेरळ ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कामबंद आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेतन थकीत संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उपसरपंच मंगेश म्हस्कर यांनी थकीत वेतन हे कशा प्रकारे कर्मचारी वर्गाला देण्यात येईल या संदर्भातील नियोजनाबाबत बाजू मांडत नागरीकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील आर्थिक व लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठ्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधितून होणाऱ्या विकासाला खीळ बसलेली होती. तर कामगारांचे वेतन देखील थकीत होते. याबाबत गेले अनेक महिने कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला. मात्र, आज, उद्याच्या आशेवर राहूनही कर्मचाऱ्यांचे थकीत ९ महिन्यांचे पगार त्यांना मिळाले नसल्यामुळे दिनांक ११ मार्च रोजी नेरळ ग्रामपंचायतीत असलेल्या मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या युनिटने काम बंद आंदोलनाची हाक दिली. तर नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने कामगारांची भेट घेऊन दोन पगार करू असे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीने चर्चा करून देखील कामगारांच्या पगाराचा तिढा काही केल्या सुटू शकला नाही. त्यामुळे दिनांक १३ मार्च रोजी देखील आंदोलन सुरू राहिल्याने थकीत पगार द्या अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी जाहीर केली असल्याने नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने पुन्हा कामगारांची भेट घेऊन दोन पगार करू असे आश्वासन दिले. मात्र, थकीत पगार द्या अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी जाहीर केल्याने व तीन दिवस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू राहिले असल्याने नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेतन थकीत संदर्भात आपली बाजू पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यासाठी दि. १३ मार्च रोजी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेला सरपंच उषाताई पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, ग्रामसेवक कार्ले, सदस्य संतोष शिंगाडे, माजी उपसरपंच शंकर घोडविंदे, सदस्या गीतांजली देशमुख, श्रध्दा कराळे, जयश्री मानकामे, शिवाली पोतदार, उमा खडे उपस्थित होते. यावेळी घरपट्टी वाढ व नागरिकांच्या आलेल्या हरकती यामुळे सहा महिने घरपट्टी वसुली थांबली असल्याने कामगारांचे वेतन हे थकीत राहिले असल्याचे तर आता घरपट्टी वसुली सुरू केली असुन, आम्ही कामगारांना महिन्याला थकीत वेतनापैकी एक व चालू वेतन असे दोन पेमेंट देऊन थकीत वेतन व कर्ज हप्ते, प्रॉव्हिडंट फंडाची थकीत रक्कम भरणा करून दोन्ही प्रश्न मार्गी लावू असे उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगत कामगारांना आपले काम बंद आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम नेरळ ग्रामपंचायतीकडे लवकरात लवकर भरणा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेरळच्या नागरिकांना केले आहे.
