वार्ताहर
उरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक अनिल भास्कर म्हात्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (दि. १७) निधन झाले आहे. मुत्यु समयी त्यांचे वय ५४ वर्षे होते.
खोपटा गावातील अनिल भास्कर म्हात्रे हे शांत, मनमिळाऊ प्रेमळ स्वभावानी जनमानसात लोकप्रिय होते.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून प्रथमतः त्यांनी पोलादपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यातील खोपटा, चिरनेर, पाणजे, मुळेखंड शाळेवर शिक्षक म्हणून काम पाहिले. अनिल म्हात्रे यांना २०१४-१५ साली रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. सध्या अनिल म्हात्रे हे चिर्ले गावातील प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. रविवारी (दि. १७) नातेवाईक मंडळींकडे कार्यक्रमास्थळी जात असताना खोपटा रस्त्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. खोपटा गावातील स्मशानभूमीत त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
