शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतजमिनी नापीक
निवडणुकीत मतदान न करण्याचा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे चाणजे येथे सुमारे १००हुन अधिक कुटुंब शेतकऱ्यांच्या २५० एकर जमिनीवर खारफुटीचे अतिक्रमण झाले आहे. शिवाय शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा इतिहास न पाहता सीआरझेडमध्ये दाखविल्याने स्वतःच्या मालकीची शेती असून सुद्धा शेतकरी (मालक) ही जमीन कोणाला विकू शकत नाही तसेच या क्षेत्रात कोणतेही पीक घेऊ शकत नाही. अशा गंभीर समस्येमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. परिणामी स्वतःच्या मालकीची शेती असूनही येथील शेतकरी स्वतःच्या मूलभूत न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदिर, कोंढरीपाडा, उरण येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चाणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या न सुटल्याने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर एकमताने बहिष्कार टाकून निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या ५० ते ६० वर्षापूर्वी मौजे चाणजे खाडीतील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जात होती, परंतु कालांतराने बंदिस्त तुटत गेल्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतीत येऊ लागले परिणामी येथील शेतजमिनीत खारफुटीचे अतिक्रमण होत गेले.अनेक वृक्षांचे, कांदनवळचे शेतात अतिक्रमण झाले.अशा प्रकारे मौजे चाणजे येथील शेतजमीन समुद्राच्या पाण्याखाली आणि खारफुटीखाली गेली.चाणजे येथील शेतजमिनीचा इतिहास न पाहता आत्ताच्या परिस्थितीचा विचार करून सरकारी यंत्रणा व हायकोर्ट कडून पिकती भातशेतीची जमीन सीआरझेड व खारफुटीत दाखवण्यात आली आहे. परिणामी ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे (भातशेती पीक) असलेली शेतजमीन “ना पिकवू शकत, ना विकू शकत” अशी शून्य मोल झाली आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. आजतागायत येथील शेतजमीनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी व शेतकऱ्यांना एवढ्या गंभीर समस्येतून न्याय देण्यासाठी येथील पुढारी, नेत्यांनी विधानसभा, विधान परिषद सभागृहात किंवा इतर योग्य ठिकाणी हा गंभीर प्रश्न,समस्या उपस्थित केला नाही. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने जोपर्यंत येथील बाधित शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर मौजे चाणजे येथील बाधित शेतकऱ्यांद्वारे बहिष्कार टाकण्याचे ठरले आहे.

या संदर्भात रविवार दिनांक १७/०३/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हनुमान मंदिर, कोंढरीपाडा येथे सभा आयोजित केली होती. शेतकऱ्यांनी आपले विचार मांडून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याची माहिती चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली आहे. या सभेस चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे, सेक्रेटरी निशिकांत म्हात्रे, खजिनदार नितीन म्हात्रे, परशुराम थळी, कृष्णा पाटील, रुपेश म्हात्रे,सुरेश थवई, धर्मेंद्र ठाकूर, अनिकेत ठाकूर, गणेश म्हात्रे, चैतन्य थळी, मंगेश म्हात्रे आणि इतर शेतकरी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.
