अमुलकुमार जैन
अलिबाग : निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आहे. एका मतानेही सत्तेचा सारीपाट विस्कटून जातो. याचा प्रत्यय निवडणुकीत कित्येकदा आला आहे. त्यामुळे एक मत नशीब उजळू शकते किंवा सत्तेपासून दूर नेऊ शकते. याच कारणांमुळे उमेदवारांकडून मतदारसंघातील सर्वच मतदारांचा मत रूपी आशीर्वाद घ्यावा लागतो. आता लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा दोन्ही निवडणुकीत उमेदवारांना मात्र मातृशक्तीचाच आशीर्वाद तारणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवाराकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत. यासाठी खास आराखडा प्रत्येक पक्षांकडून तयार केला जात आहे.
रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. निवडणुकीला घेऊन उमेदवारांसोबत जिल्हा प्रशासनसुद्धा कामाला लागले आहे. रायगड लोकसभा अंतिम मतदार यादीसुद्धा प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादीनुसार रायगड लोकसभा मतदार संघात येणारे रायगड जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा असे एकूण सहा विधान सभा मतदार संघात
एकूण १६ लाख ५३हजार ९३५ मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. यात ८ लाख ३ हजार १५पुरुष तर ८ लाख ४० हजार ४१६ महिला मतदार आहेत. रायगड लोकसभा पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यात २६हजार ९०१ महिला मतदार अधिक आहेत. ही आकडेवारी बघता रायगड लोकसभा मतदारसंघात महिलाच ‘किंगमेकर’ दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्याची आकडेवारी झाली असली तरी रायगड जिल्ह्यात असणाऱ्या पनवेल,कर्जत, उरण, हे विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदारसघांत तर पेण, अलिबाग, महाड, आणि श्रीवर्धन हे विधान सभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात येत आहेत.तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन मतदार विधान सभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात येत असून पेण वगळता इतर सहा विधान सभा मतदार संघात महिला मतदाराची संख्या ही जास्त आहे.
पुरुषांच्या तुलनेत अगोदरच महिला मतदारांची संख्या २६हजार ९०१ एवढी जास्त असून रायगड जिल्ह्यात महिला राजकारणातील महत्वाचा फॅक्टर ठरणार आहेत, यात शंका नाही. अशात मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना महिलांचा आशीर्वादच राजयोग घडवून देणारा ठरणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन आमदार शिंदे गटाचे, तर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे. पक्षफुटी आधी एकट्या शिवसेनेचे चार आमदार इथे होते. म्हणजे, शिवसेनेची ताकद होती, असं मानायला हरकत नाही. मात्र, आता शिवसेनेतच फूट पडल्यानं ती ताकदही विभागली गेलीय.
३२ रायगड लोकसभा मतदार संघ
एकूण मतदार/१६,५३,९३५
पुरुष/८,१३,५१५
स्त्री/८,४०,४१६
तृतीयपंथी/०४
दिव्यांग/८०४६
१८-१९ वयोगटातील मतदार/१६२८८
८५+ मतदार/३१०२८
३२ रायगड लोकसभा मतदार संघ विधानसभा निहाय
| विधानसभा मतदार संघ | पुरुष | स्त्री | तृतीयपंथी | एकूण |
| १९१/पेण | १,५२,०१३ | १,४९,४१३ | १ | ३,०१,४२७ |
| १९२/अलिबाग | १,४५,५२४ | १,४८,३०८ | ० | २,९३,८३२ |
| १९३/श्रीवर्धन | १,२७,५४९ | १,३२,२७२ | १ | २,५९,८२२ |
| १९४/महाड | १,४०,७०१ | १,४१,०१८ | २ | २,८१,७२१ |
| २६३/दापोली | १,३३,३९३ | १,४४,२७९ | ० | २,७७,६७२ |
| २६४/गृहागर | ११४३३५ | १२५१२६ | ० | २,३९,४६१ |
| एकूण | ८,१३,५१५ | ८,४०,४१६ | ०४ | १६,५३,९३५ |
