• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी किशन जावळे

ByEditor

Mar 17, 2024

प्रतिनिधी
रायगड :
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले,रायगड मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात कालपासून लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय- निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.

शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. ‘सी- व्हिजील’ अॅपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मतदान केंद्रांवरील सुविधा विशेषत: पाणी, वीज, स्वच्छता गृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प याचेही आतापासून नियोजन करा. सर्व संबंधित यंत्रणानी मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी करावी. तसेच आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा तयार करून घ्याव्यात. तसेच भरारी पथक सक्रीय ठेवा.आचारसंहिता काळात नवीन विकास कामाना परवानगी देता येणार नाही. तसेच नवीन कामाना सुरुवात करता येणार नाही. सध्यस्थितीत सुरु असलेली कामे नियमित पणे सुरु ठेवायची आहेत असेही श्री जावळे यांनी स्पष्ट केले.

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी ‘स्वीप’चे आतापासूनच नियोजन करावे. त्यादृष्टीने काही वेगळे अनोखे उपक्रम राबवावेत. सर्व समाज घटकांचा यामध्ये सहभाग घ्यावा. त्यांच्यामध्ये जनजागृती करावी असेही निर्देश श्री जावळे यांनी यावेळी दिले.

निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. शासकीय विश्राम गृह यांचा वापर राजकीय कारणासाठी अथवा प्रचार, सभा, मेळावे यासाठी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. कुणीही राजकीय प्रचारात सहभागी होऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणूक ही सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी आपल्या कर्तव्याचे आणि जबाबदारीचे पालन करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीला सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच सर्व नोडल अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!