• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये सततच्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे आर्थिक साटेलोट

ByEditor

Mar 19, 2024

घनःश्याम कडू
उरण :
मागील अनेक महिन्यापासून उरण शहरात व तालुक्यातील अनेक गावांत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. यामुळे शहरातील व गावोगावचे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र फावत पहावयास मिळत आहे. सदरचे खोदकाम हे प्रशासनाच्या परवानगीने होत असले तरी ठेकेदार थूकपट्टीचे काम करून मोकळा होत आहे. मात्र त्याचा त्रास रस्त्यावरून प्रवास करणार्‍यांना नाहक सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित प्रशासन विभागाकडे तक्रारी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यावरून खोदकाम करणारे ठेकेदार व अधिकारी वर्ग यांचे आर्थिक साटेलोट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मागील काही दिवसांपासून कुठे जलमिशन पाण्याची पाईप लाईन, जिओची केबल, गॅस लाईन, वीज केबल तसेच सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत, असाच प्रश्‍न पडतो. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

उरण नगरपालिकेने गेल्या पाच वर्षांत शहरातील अनेक भागात सिमेंट-काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार केले. या रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधींचा निधीही खर्च केला, मात्र सिमेंट-काँक्रीट रस्त्याचे काम करताना या रस्त्याखाली टाकण्यात आलेल्या भुयारी गटारांच्या वाहिन्या फुटण्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते दुरुस्तीकामासाठी खोदण्यात आले आहेत. अनेक वर्षांनंतर सिमेंट-काँक्रीट रस्ते तयार होत असताना, काही काळातच हे रस्ते पुन्हा मलनि:सारण वाहिनीच्या कामासाठी व विजेची केबल टाकण्यासाठी नगरपालिकेकडून खोदण्यात येत असतात. त्यासाठी थेट सिमेंटचा रस्ताच खोदला. नगरपालिकेच्या भुयारी गटारांच्या कामातील चुकांमुळे वारंवार शहरातील सिमेंट रस्ते खोदण्यात येत असल्याने नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. तसेच तालुक्यातील गावोगावी जलमिशन अंतर्गत पाण्याची पाईप लाईन, गॅस लाईन व जिओ केबलची लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदरचे काम हे ठेकेदार संबंधित विभागातील सत्ताधार्‍यांना लाखों रुपये देऊन परवानगी घेऊन खोदकाम सुरू करतात. काही ठिकाणी तर खासगी मालकाच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता दबाव तंत्राचा वापर करून ठेकेदार खोदकाम करीत आहेत. ठेकेदार खोदकाम करून काम झाल्यानंतर फक्त माती ओढुन खोदकाम बुजविले जात आहेत. यामुळे अनेक अपघात झाले आहेत व होत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. मात्र त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघात व वाहतूक कोंडीचा सामना जनतेला करावा लागत आहे.

याबाबत संबंधित ठेकेदारांकडे विचारणा केली असता आम्हांला परवानगी दिली असून त्याची रीतसर रक्कम भरली असल्याचे सांगतात. यावरून ठेकेदारांकडून सत्ताधारी व अधिकारी वर्ग यांना आर्थिक मलिंदा मोठ्या प्रमाणात मिळत असल्यानेच शहरातील व तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र उरणमध्ये पहावयास मिळत आहे. हे उरणकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!