• Tue. Jul 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अटल सेतूवर पहिली आत्महत्या; दादर येथील डॉक्टर महिलेने समुद्रात दिले झोकून

ByEditor

Mar 20, 2024

घन:श्याम कडू
उरण :
अटल सेतूवर रविवारी पहिल्या आत्महत्येची नोंद झाली. टॅक्सीने सेतूवर येऊन किंजल शहा (43) या महिलेने समुद्रात उडी टाकली. न्हावा शेवा पोलीस त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. किंजल शहा या डॉक्टर होत्या. परंतु त्या गेल्या दहा वर्षांपासून नैराश्याच्या गर्तेत सापडल्या होत्या. नैराश्यातून किंजल यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.

दादरच्या नवीन आशा इमारतीत किंजल त्यांच्या कुटुंबियांसह राहत होत्या. जरा बाहेर जाऊन येते असे वडिलांना सांगून त्या रविवारी दुपारी शिंदेवाडी येथे टॅक्सीत बसून निघून गेल्या. किंजल यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट वडिलांना सापडली. अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. त्यांच्या वडिलांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. किंजल यांनी टॅक्सी पकडली तेथून भोईवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता टॅक्सी अटल सेतूवर गेल्याचे व सेतूवरून किंजल यांनी समुद्रात उडी टाकल्याचे निष्पन्न झाले.

किंजल यांनी टॅक्सी अटल सेतूवर नेल्यानंतर त्यांनी चालकाला पुन्हा टॅक्सी मुंबईच्या दिशेने वळविण्यास सांगितली. त्यानुसार चालकाने टॅक्सी पुन्हा माघारी वळविल्यानंतर किंजल यांनी टॅक्सी बाजूला थांबविण्यास सांगितली, पण चालकाने टॅक्सी थांबविली नाही. अखेर चालकाला टॅक्सी थांबविण्यास भाग पाडून किंजल यांनी संधी साधत समुद्रात उडी टाकली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!