पुन्हा निर्माण होऊ पाहणाऱ्या मनुवादाला तोंड देण्यासाठी एक व्हा; आनंदराज आंबेडकर यांचे आवाहन
मिलिंद माने
महाड : चवदार तळ्याचा ९७वा सत्याग्रह स्मृतिदिन आज साजरा झाला. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भीमसैनिक महाडमध्ये दाखल झाले होते. या क्रांती दिनाच्या निमित्ताने आलेल्या भीमसैनिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना मनुवाद निर्माण होत असून त्याला तोंड द्यायचे असेल तर सर्वांनी एक झाले पाहिजे असे आवाहन यावेळी केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी १९-२० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सामाजिक क्रांती केली. या सामाजिक क्रांतीची नोंद जागतिक पाटलावर झाली. गेली अनेक वर्ष चवदार तळे स्मृती दिनाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे. विविध संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीने विविध सभा आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. दि. १९ आणि २० मार्च या दोन दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. चवदार तळे येथे आज पहाटेपासूनच भीमसैनिकांनी अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी नऊ वाजता शासनाच्यावतीने पोलीस मानवंदना देखील देण्यात आली. महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते विविध संघटनांनी काढलेल्या मिरवणुका आणि भीम ज्योतीने संपूर्ण चवदार तळे भीम जय घोषाने दुमदुमून गेले. आलेल्या भीमसैनिकांनी आंबेडकर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्राशन केले. शाहीर जलसा आणि आंबेडकरी गीतांनी चवदार तळ्यावर चैतन्य निर्माण झाले होते. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने महाडमध्ये घेण्यात आलेल्या श्रामणेर शिबिराचा समारोप यावेळी करण्यात आला. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी भंतेंनी शहरातून “सबका मंगल होय रे” म्हणत संचलन केले. समता सैनिक दलाच्या वतीने देखील महाड शहरातून शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संचलन करत अभिवादन केले.

यावेळी बौद्धजन पंचायत समिती, भारिप बहुजन महासंघ, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कोकण रिपब्लिकन संघटना, भारत मुक्ती मोर्चा, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, आदी सामाजिक राजकीय आणि धार्मिक संघटनांनी अभिवादन सभांचे आयोजन केले होते. यापैकी बौद्धजन पंचायत समितीचे आनंदराज आंबेडकर यांनी भीमसैनिकांना मार्गदर्शन करताना सत्ताधाऱ्यांना टिकेचे लक्ष केले. संपूर्ण देशभरामध्ये पुन्हा मनूवाद निर्माण केला जात असून आपण सगळे शांत बसलो आहोत. आपण सगळ्यांनी एक होणे आवश्यक आहे असे आवाहन यावेळी केले. देशात बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे आपले सोने झाले पण मनुस्मृती ने काय होईल याचा विचार करा. हे थांबवायचं असेल तर एक व्हा आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध व्हा असे आवाहन देखील केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे देखील शासनाच्या मध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी शाहिरी कार्यक्रम आणि आंबेडकरी गीतांचा आनंद घेता आला.
यावर्षी आचारसंहिता असल्याने राजकीय बॅनरबाजी मात्र झाली नसली तरी काही ठिकाणी कमानी दिसून येत होत्या. महाड नगरपरिषदेने सालाबाद प्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आंबेडकरी अनुयायांसाठी मंडप, तर अनेक सामाजिक संस्थांनी भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाड शहराच्या सर्व प्रवेशद्वारांच्या बाजूलाच वाहन पार्किंग सुविधा केल्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली.