केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मनसेला महायुतीत घेण्यास विरोध
मिलिंद माने
महाड : मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नसून त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही!”असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार रामदास आठवले यांनी महाडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या दरम्यान केले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे महाड येथे चवदारतळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने आले असता त्यावेळी ते बोलत होते.
यावर पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली देशाचा कारभार सुरळीत चालू असून काँग्रेसच्या कालावधीत कोणतीही विकासकामे झाली नाहीत असा आरोप केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारके देखील जी काँग्रेस कार्यकाळात कधीही होऊ शकली नाहीत ती नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाली असल्याचे सांगत नरेंद्र मोदी हेच खऱ्या अर्थाने देशाचे विकास पुरुष असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
आरपीआय हा बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून दलितांसोबत बहुजनांना देखील समाविष्ट करून घेणारा पक्ष आहे आणि आगामी येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे हे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य या पक्षामार्फत करण्यात येईल असे त्यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सांगितले. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना देखील त्यांनी सविस्तरपणे उत्तर दिली. या पत्रकार परिषदेला आरपीआयतर्फे अनिरुद्ध महातेकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा युवा अध्यक्ष प्रमोद महाडिक, कोकण युवा अध्यक्ष शेखर सकपाळ, महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण जाधव, दलित मित्र दादासाहेब मर्चंडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
“भाजपा संविधान संपवत आहे ही अफवाच”
भारतीय जनता पार्टी संविधान संपवित आहे अशी निव्वळ अफवा असल्याचे सांगत काँग्रेस तसेच इतर विरोधी गटातर्फे ही अफवा पसरविण्यात येत असून पंतप्रधान मोदी हे सबका साथ सबका विकास या मार्गाने चालणारे आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात संविधानिक मार्गाने विविध निर्णय घेतले गेल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआय पक्षाला किमान दोन जागांची अपेक्षा आहे आणि तशी मागणी सुद्धा आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, याबाबत एनडीएतर्फे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो मान्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साथीने अबकी बार चारसो पार निश्चित करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.