घन:श्याम कडू
उरण : रंगपंचमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रंग, गुलाल आणि विविध प्रकारच्या फॅन्सी पिचकाऱ्यांची बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे. दूरवर गुलाल उडवणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या पायरो गन विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. ही पिचकारी सेलवरही चालते.
हाेळीमध्ये विविध रंगांची उधळण करण्यासाठी लहान मुले पिचकारीची आवर्जून मागणी करतात. विविध प्रकारच्या गन स्वरूपातील पिचकारी यंदा बाजारात दाखल झाल्या आहेत. गन पिचकारीमध्ये अल्क गन, वॉटर गन, मशीन गन, ए. के. ४७, ओव्हरलोड गन, बाहुबली गन, पंचवटी गन, भोंगा गन, हायड्रोजन पंप अशा पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे. पर्यावरणपूरक रंगांना ग्राहकांकडून मागणी आहे. रंगपंचमीच्या वस्तू मस्जिद बंदर येथून विक्रीसाठी आणण्यात येत असून यंदा किमतीमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अब्बू चाचा यांनी दिली. आसीम मेमन हे गेल्या अनेक वर्षांपासून होलसेल दरात विक्री करतात.
असे आहेत दर
गन पिचकारीची किंमत ३० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत आहे. रंग उधळण्यासाठी अग्निशामक उपकरणाप्रमाणे ४ किलोपासून ते ६ किलोच्या रूपात रंगांची उधळण करणारे सिलिंडर उपलब्ध आहेत. स्पायडर मॅन, छोटा भीम, मोटू पतलू, मिकीमाऊस, अँग्री बर्ड, डीझनी वर्ल्ड, कॅप्टन अमेरिका, फ्रोजन, मुलींसाठी बार्बी प्रिंटवाली पिचकारी मिळत आहे. तसेच आयपीएल क्रिकेट टीममधील सेलिब्रिटी टीमची प्रिंट असलेल्या पिचकाऱ्यादेखील हातोहात विकल्या जात आहेत.