• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धाटाव येथील साधना कंपनीत चोरी; गुन्हा दाखल

ByEditor

Mar 28, 2024

भंगार चोर कामगारांना पकडले, भंगार माफिया मात्र मोकाट

अमोल पेणकर
रोहे :
तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीत दिवसाढवळ्या होणारी चोरी सुरक्षारक्षकांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली आहे. शुक्रवार, २२ मार्च रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या मेन गेटवर कंपनीमधून बाहेर जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना ही चोरी समोर आली. कंपनी प्रशासनाने याप्रकरणी रोहा पोलिसांत परप्रांतीय भंगार कामगारांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र, धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये नेहमीच अशी लूटमार करून गब्बर झालेल्या या कामगारांच्या मालकांवर काय कारवाई होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रोहा तालुक्यासह रायगडमधील सर्वच कंपन्यामधील भंगार माल व्यवसाय हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. झटपट श्रीमंत करणारा या व्यवसायावर बड्या राजकीय नेत्यांचा नेहमीच वरदहस्त राहिला आहे. स्थानिक पातळीवर अनेक नेत्यांनी आपापल्यात या धंद्याची वाटणी करून यातून करोडो रुपये कमवत आहेत. मात्र, हे करताना दमदाट्या करत चोऱ्याही करण्यास हे भंगार माफिया आघाडीवर राहिल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशीच एक भंगार चोरीची घटना साधना नायट्रोकेम या कंपनीमध्ये उघडकीस आली आहे. २२ मार्च रोजी भंगार उचलण्याचा ठेका दिलेल्या ठेकेदाराचे कामगार कंपनीमधील एमएपी प्लॅंट नं. २ मध्ये आले होते. त्यावेळी आपले काम संपवून जात असताना त्यांनी सोबत आणलेल्या एमएच ०६ बीजी १९३७ या टेंपोमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे मेन गेटवरील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी त्या टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये कंपनी मधील काही स्टीलचे व्हॉल्व असल्याचे आढळून आले. यामध्ये स्टीलचे तीन ५० एनबी बॉल व्हॉल्व याची अंदाजे किंमत १३५० रुपये, १०८० किमतीचे एक स्टीलचे ६५ एनबी व्हॉल्व बॉडी ग्लोब, दोन स्टीलचे ९०० रुपये किमतीचे ५० व्हॉल बॉडी ग्लोब प्लग हे सामान विना परवानगी चोरून नेत असल्याचे आढळून आले. यासर्व मालाची एकूण किंमत ३३३० रुपये आहे.

याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाने रोहा पोलिसांत अब्दुल मकबूल मलिक, अबुहमजा मारुख खान, सोएब मोहम्मद अस्लम यांच्यावर गुन्हा दाखल केला असून हे सर्व परप्रांतीय असून मुळचे उत्तर प्रदेश सध्या रोहे शहराजवळ म्हाडा कॉलनी व धनसे कॉम्प्लेक्स येथे वास्तव्यास आहेत. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक देविदास मुपडे यांचे मार्गदर्शनाखाली रोहा पोलिस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!