सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घेतली भेट
शशिकांत मोरे
धाटाव : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर मागील तीन वर्षापूर्वी झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी आज माणगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्याकडून अखेरचा युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान, झालेल्या युक्तिवादानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी ॲड. उज्वल निकम यांची भेट घेऊन या प्रकरणी उत्तमरीत्या लक्ष घातल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

तांबडी येथे सायंकाळी शेतावरून आपल्या आजोबांना घरी आणण्यासाठी गेलेली मुलगी अचानक बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह रात्री उशिरा आढळून आला होता. पोलीस तपासात सामूहिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर अल्पवयीन, अत्याचार व खून प्रकरणी मराठा क्रांती मोर्चा, स्थानिक सकल मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता. आरोपींना तात्काळ अटक करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा असा सर्वच स्तरांतून पोलिस यंत्रणेवर दबाव वाढल्याने अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणाची दखल गृहविभागाला घ्यावी लागली आणि आरोपींनाही अटक करण्यात आले. तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅकद्वारे चालविण्याची आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची मागणी केली होती.
याबाबत आज गुरुवारी माणगाव येथे न्यायालयीन कामासाठी आलेल्या ॲड. उज्ज्वल निकम यांची पीडित मुलीची आई रिया म्हांदळेकर, शाम लाड (मामा), राजश्री पाटणकर (आत्या), रंजना पूरव (आत्या), ज्ञानेश्वर सावंत (आजोबा) यांसह सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) देशमुख, संदीप सावंत, प्रशांत देशमुख, उदय शेलार, स्वप्नील शिंदे, समीर मोरे यांसह समाज बांधवांनी भेट घेऊन या प्रकरणी उत्तमरीत्या लक्ष घातल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याठिकाणी माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आज अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी सर्वच पुराव्यासह युक्तीवाद झाला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनीही तपासात चांगलीच कामगिरी दाखविली असल्याने निकाल प्रक्रीया सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पीडितेला न्याय मिळेल असा ठाम विश्वास ॲड. उज्ज्वल निकम यांनी याप्रसंगी दिला.