“लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे बँकेत पैसे येत नाहीत”, व्यवस्थापनाचे उर्मट उत्तर
अनंत नारंगीकर
उरण : बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेतून खातेदारांना गरजेच्या वेळी पैसेच मिळत नाही. त्यामुळे खातेदारांना बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे हात हलवत घरी परतावे लागत असल्याने खातेदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
चिरनेर पंचक्रोशीतील हजारो गरीब, गरजू खातेदार रहिवाशांनी आपआपल्या पैशाची सुरक्षित ठेव म्हणून तसेच गरजेच्या वेळी ठेव केलेले पैसे वेळेवर मिळावे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिरनेर येथे जमा केली आहे. परंतु बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे खातेदारांना गरज असताना वेळेवर स्वतःचे पैसेच मिळत नाहीत. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेतून हात हालवित घरी परतावे लागत असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.
यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेकडे विचारणा केली असता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापनानी उर्मटपणे नाव न सांगता सांगितले की, सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्याने बँकेत वेळेवर पैसे येत नाहीत. त्यामुळे आम्ही खातेदारांना बँकेतून पैसे देऊ शकत नाहीत.
