• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अपघातातील आरोपी जय घरत याला वाचविण्यासाठी राजकीय यंत्रणेचा दबाव?

ByEditor

Apr 16, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत रेगणार हॉस्पिटल सेक्टर 23, उलवे येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. यावरून आरोपी जय घरत यास वाचविण्यासाठी राजकीय यंत्रणेचा दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उरण शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता क्रेटा कार चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली. चारचाकी गाडीचा चालक चरस, गांजा सारख्या नशिली पदार्थांचे सेवन करून नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर कार चालकाने रेल्वे पोलिसांशी अरेरावीकरून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. काही व्हिडीओ व्हायरल झाले त्यामध्ये घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस दाखल असतानाही आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा पळून जाण्यात कसा यशस्वी झाला अशी चर्चा सुरू आहे. याचा गाजावाजा होऊनही आजतागायत पोलीस आरोपी जय घरत यास अटक करू शकले नाहीत.

अपघातग्रस्त कुटुंब

अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या दुर्दैवी घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये वाहतुक पोलीस व उरण पोलीस वर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यावेळी आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा सुद्धा तिथे असल्याचे व्हिडीओमध्ये सरळसरळ दिसत आहे. मग आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील हे आमदार महेश बालदी यांच्या मर्जीतील असल्याने आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे बोलले जाते.

पोलिसांनी आरोपीने नशिली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड होऊ नये म्हणून पळून जाण्यास मदत केली असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात दोन जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरूनही चालक पोलिसांसमोरून पळून गेल्याने पोलिसांची प्रतिमा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात मलिन झाली असल्याची जनतेत चर्चा सुरू आहे. आरोपी जर जखमी असेल तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असताना परस्पर त्याचे मित्र किंवा इतर लोक कसे काय घेऊन जाऊ शकतात. तरी व्हिडीओमध्ये जे त्याच्याबरोबर दिसतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे यापुढे इतरांना वचक बसेल अशी चर्चा सुरू आहे. नशीली पदार्थांचा अंश पोटामध्ये काही तास असतो. तो उघड होऊ नये म्हणून तर त्याला पळविण्यात आले नाही ना? तो नॉर्मल झाल्यानंतर आरोपीस अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.

अपघातानंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले आहे. परंतु, शनिवार दि. ६ एप्रिल रोजी अपघात घडल्यानंतर आज ८ दिवस उलटूनही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी आरोपी जय चंद्रहास घरत यास अटक केली नसून त्याच्यावर रेगणार हॉस्पिटल, सेक्टर 23, उलवे येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती दिली. मात्र, अजूनही आरोपीस अटक केली जात नसल्याने आरोपीस वाचविण्यासाठी हा सर्व अट्टाहास सुरू असल्याची चर्चा उरणच्या नाक्यांनाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे.

आरोपी जय घरत यास अटक दाखवून त्यास त्वरित जामिनावर सुटका करण्यासाठी किंवा अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकृत सुत्रसंकडून समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!