• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळेकरांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत धाविरदेवांची यात्रा २२ एप्रिल रोजी

ByEditor

Apr 20, 2024

वैभव कळस
म्हसळा :
म्हसळा आणि परिसरातील वाड्या-वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या, सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री धाविरदेव महाराजांची यात्रा सोमवार, दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी संपन्न होत आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी श्री धाविर मंदिराच्या भव्य प्रांगणात यात्रा भरली जाते. या दिवशी चांदीचे मुखवटे, वस्त्रालंकार घालून ग्रामदेवतेला सजविण्यात येते. दुपारपासूनच ग्रामदेवता, बापूजी, काळभैरव, काळेश्वरी, जोगेश्वरी, झोलाई या देवतानांही विशेष वस्त्रालंकाराने सजविण्यात येऊन चांदीचा मुखवटा वगैरे अलंकार परिधान करून प्रसन्न व आनंदी उत्साहात वतनदारांची स्थापना केली जाते. रात्री आठच्या सुमारास पालखीने श्री शंकर मंदिरा शेजारीच वात्सव्य करून बसलेल्या बापूजींना वाद्य वाजंत्रीसह यात्रेच्या ठिकाणी मानाने आणले जाते. परतीच्या वेळी पालखीत बापूजींच्या वास्तव्यामुळे पालखीचे वजन आपोआप वाढते अशी पूर्वापार आख्यायिका आहे. त्याची सत्यता पडताळण्यासाठी व श्रद्धेने आणि भावनेने नेणा आणण्यासाठी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते.

संग्रहित

यात्रेदिवशी संपुर्ण गावाभोवती वेस (शिव) बांधण्याची प्रथा असून गावात वाईट प्रवृत्ती, रोगराई, संकटे येऊ नये तसेच ग्रामस्थांना उत्साही ठेवण्यासाठी गावाची शिव बांधून ग्रामस्थ व गावातील इतर वतनदार यांच्यासह हरिजन समाजाचे मानकरी विशेष प्रार्थना करतात. श्री धाविरदेव मंदिर ते संपुर्ण शहरभर यात्रा भरविण्यात येऊन यात्रेचे वातावरण आनंदी व उत्साही ठेवण्यात येते. परंपरागत चालणाऱ्या या यात्रोत्सवास सुमारे ७५ वर्षांपासून तालुक्यातील सुमारे ८४ गावातील सजविलेल्या काठ्या ढोलबाजांच्या गजरात येत होत्या. त्यामुळे यात्रेचे वातावरण अधिक आनंदी व उत्साही होत असे, परंतु नजिकच्या काही वर्षापासून विजेचे पोल, विजेच्या, टेलीफोनच्या तारांच्या विखुरलेल्या जाळ्यांमुळे यात्रेकरुंच्या आनंदात वीरजण पडल्यासारखे झाले आहे.

संग्रहित

यात्रेला ८४ काठ्या येत होत्या आता तो आकडा जेमतेम १७ ते २० वर येऊन थांबला आहे. यात्रेला सर्वप्रथम केलटे गावातील काठीला मानाचे स्थान असून म्हसळा ग्रामदेवतेच्या काठीने केलटे गावातील काठीला मानवदंना देण्यात येते. यात्रेनिमित्त म्हसळ्यातील ग्रामस्थांनी ग्रामीण पातळीवरील लोकांचे स्वागत करावे व तेवढ्याच जबाबदारीने सर्वांचे रक्षण करावे अशी या मागील भावना असल्याचे जूने लोक सांगतात.

रात्रभर चालणाऱ्या या यात्रेत अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण सहभागी होतात. यात्रेच्या मध्यरात्रीपासून (रात्री बारा वाजले पासून) ग्रामदेवतेची पालखी निघते आणि संपुर्ण शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात येते व नवसांची फेड व नविन नवस केले जातात. या ग्रामदेवतेच्या यात्रेचे इतके महत्व आहे कि, अगदी मुंबई, पुणे, ठाणे या भागात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे या दिवशी हजारोच्या संख्येने आवर्जून आपली उपस्थिती दर्शवितात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!