छत्रपती शिवराय म्हणजे दैवत -हभप पुरुषोत्तम महाराज मोरे (देहूकर)
मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४४वी पुण्यतिथी आज किल्ले रायगडावर भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. यावेळी बोलताना किल्ले रायगडावरील राज दरबारात दहा वर्षांपूर्वी सुरू असलेली पोलीस दलाची मानवंदना पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महाडचे आमदार गोगावले यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची ३४४वी पुण्यतिथी आज किल्ले रायगडावर साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या किल्ले रायगडावर आपला देह ठेवला त्या रायगडावर भावपूर्ण वातावरणात शिवभक्तांनी आदरांजली वाहिली. शिवसमाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली. श्री जगदीश्वर मंदिरात दीपवंदना, रात्र शाहिरांची या कार्यक्रमासोबतच हरिपाठ आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

किल्ले रायगडावर पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी पाच वाजता श्री जगदीश्वराची पूजा त्यानंतर हनुमान जयंती उत्सव, किर्तन, शिवसमाधी महापूजा, राजदरबारातील शिवप्रतिमा पूजन, मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी हिंदू जनमानसाला जोडणारा दुवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशात ओळखले जातात असे मत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हभप पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांनी छत्रपतींना देवत्व प्राप्त झाले होते अशा शब्दात छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला. प्रतिवर्षाप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ पुणे, स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४व्या पुण्यतिथी दिनानिमित्त किल्ले रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड गडारोहण स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हभप पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांच्यासह सरसेनापती प्रतापराव गुजर व हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याचे वंशज तसेच एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर, मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
