विद्यार्थी केंद्र बिंदू मानून आपले कर्तव्य जोमाने पार पाडा -गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे
श्रीवर्धन तालुक्यातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
अभय पाटील
बोर्ली पंचतन : प्रत्येक शिक्षकांची, विद्यार्थीयांची चिकाटी जिद्द वाखाणण्याजोगी आहे. तालुक्याचे नाव उंचावले असल्याचे प्रतिपादन श्रीवर्धन गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी केले. श्रीवर्धन तालुक्यातील पंचायत समिती विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानामध्ये तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांना तसेच सन 2022- 2023 व 2023-2024 मध्ये विज्ञान प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

श्रीवर्धन तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सन 2022-2023 व 2023-2024 मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानामध्ये शासकीय शाळा गट व खासगी शाळा गट यामध्ये पारितोषिक प्राप्त शाळांचा गौरव करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी गजानन लेंडी, गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, विस्तार अधिकारी किशोर नागे, धर्मा धामणकर, विज्ञान मंडळ अध्यक्ष संदीप तमनर, गणित अध्यापक मंडळ शिवकुमार वारुळे, केंद्रप्रमुख अमोल केतकर, कृष्णा धुमाळे, भिकू पांगारकर, गणेश सावंत तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचे तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त शासकीय शाळा विभागामध्ये प्रथम क्रमांक राजिप शाळा शेखाडी मराठी, द्वितीय क्रमांक राजिप शाळा हरेश्वर, तृतीय क्रमांक राजिप शाळा साखरी तसेच खासगी शाळा विभागात प्रथम क्रमांक गालसुरे विद्यामंदिर गालसुरे, द्वितीय क्रमांक मुराद हमीद टोळ जसवली, तृतीय क्रमांक श्री मोहनलाल सोनी विद्यालय बोर्ली पंचतन त्याचप्रमाणे रायगड जिल्हास्तरावर श्रीवर्धन तालुक्यातील शासकीय विभागात राजिप शाळा रानवली या शाळेस द्वितीय क्रमांक तसेच खासगी शाळा विभागात संस्थापक रा. पा. दिवेकर दांडगूरी हायस्कुल दांडगूरी या प्रशालेस तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे म्हणाले की, विद्यार्थी केंद्र बिंदू मानून विद्यार्थी हे दैवत आहेत त्यांच्यासाठी जोमाने काम करा पुढील कालावधीत प्रत्येक अभियानात सहभागी होऊन आपल्या शाळेचे, भागाचे नाव उज्वल करा तर गटविकास अधिकारी गजानन लेंडी म्हणाले की, प्रत्येक शिक्षकांची, विद्यार्थ्यांची चिकाटी, जिद्द वाखाणण्याजोगी आहे. तालुक्याचे नाव उंचावेल अशी कामगिरी आपल्या तालुक्यातून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीने आम्हा अधिकारी वर्गाला देखील वरिष्ठ पातळीवर वेगळी ओळख निर्माण होत आहे. यापुढे देखील आपणाकडून अशीच प्रगती होत राहो यासाठी आमचे पूर्ण सहकार्य आपणास असेल.
